29 C
Latur
Saturday, March 2, 2024
Homeसंपादकीय विशेषयौवन ते विवाह

यौवन ते विवाह

तारुण्यावस्था म्हणजे मनास उमलविणारा व तनास फुलविणारा आयुष्यातील एक महत्त्वाचा संक्रमण काळ. याच काळावरून प्रत्येकाचे पुढचे भविष्य ठरले जाते. या तारुण्यात नकळतपणे चुका होतात आणि भविष्य उद्ध्वस्त होऊन जाते. म्हणून या उमेदीच्या वयात थोडीशी काळजी आणि थोडीशी जागरूकता ठेवल्यास संपूर्ण आयुष्य निरोगी, निरामय आणि यशस्वीपणे कसे जगता येईल याचे उत्तम असे मार्गदर्शन प्रा. देवबा शिवाजी पाटील यांच्या ‘यौवन ते विवाह’ या लेखसंग्रहात वाचण्यास मिळते. प्रा. देवबा पाटील हे एक सेवानिवृत्त प्राध्यापक असून त्यांना वाचन आणि लेखनाची आवड आहे. त्यांचे आजपर्यंत खूप साहित्य प्रकाशित झाले आहे. आबाल-वृद्धापर्यंत सर्वांसाठी त्यांनी लेखन केले आहे. पुणे येथील कृष्णायन प्रकाशनद्वारे प्रकाशित झालेले ‘यौवन ते विवाह’ हा लेखसंग्रह फक्त वयात आलेल्या तरुण-तरुणी यांच्यासाठीच नाही तर किशोरवयीन मुलेमुली, पालक, महिला या सर्वांसाठी उद्बोधक आणि मार्गदर्शक आहे. या पुस्तकात त्यांनी ३७ विषयांच्या माध्यमातून तारुण्यातील अनेक घटनांचा मागोवा घेतलेला आहे.

आपल्या पहिल्याच ‘यौवनारंभ’ या प्रकरणात लेखकाने तारुण्यावस्था म्हणजे काय? याचे योग्य वर्णन केले आहे. या वयात आई-वडिलांची भूमिका काय असायला पाहिजे हे सांगताना ते म्हणतात, केवळ आईवडिलांचे निर्मळ प्रेमच त्यांचा हा उत्साह नियंत्रित करू शकते. मुलांना सुधारण्यासाठी प्रेमाचा मार्ग हा गुरुत्वाकर्षणाच्या नियमाएवढा खरा व सार्वकालिक आहे. खरे प्रेम हे शहाणे असते व ते मुलांना नीट शिस्त लावते. घरात मुलांना प्रेमपूर्वक व मोकळे वातावरण मिळाले नाही तर ती मुले इतर मार्गावर वळण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरुण किंवा युवा कोणाला म्हणावे यांची खूप चांगली व्याख्या युवा सजगता या प्रकरणात वाचायला मिळते. सर्व प्रकारच्या संघर्षाला तोंड देण्याची ज्याच्यात हिंमत असते ते युवा, असे ते म्हणतात. या युवा काळात अनेक गोष्टींचे आकर्षण असते; परंतु त्यावेळी कोणत्याही आमिषाला बळी न पडता आपले ठरवलेले ध्येय गाठण्यासाठी मनात जिद्द ठेवून अतोनात मेहनत करण्याचे गुण अंगी बाणले पाहिजेत. लेखकाला तरुणांशी हितगुज करायला खूप आवडते. आजचे तरुण हे देशाचे उद्याचे भावी आधारस्तंभ आहेत.

ते जर पोकळ, निरुद्योगी आळशी आणि व्यसनी असतील तर देशाचा विकास कसा होईल? ‘तरुणाईशी हितगुज’ या प्रकरणात लेखक तरुणांना टाईमपास न करता आपला फावला वेळ पुस्तके वाचनात, आपला छंद जोपासण्यात घालावा. ज्यामुळे आपले मन अजून परिपक्व होण्यास मदत मिळते. ‘बुद्धिमत्ता देई सुबत्ता’ या प्रकरणात लेखकाने बुद्धीचा विकास करण्यासाठी वाचन, चिंतन आणि मनन करणे आवश्यक असल्याचे सांगताना आहार आणि व्यायाम हे देखील महत्त्वाचे आहे असे सांगितले आहे. जर शरीर साथ देत नसेल तर बुद्धी देखील साथ देत नाही म्हणूनच योग्य आहार, योग्य व्यायाम आणि योग्य पुस्तकांचे वाचन करून आपल्या बुद्धीचा सर्वांगीण विकास करता येऊ शकतो. जीवनाचा खरा आनंद लुटायचा असेल तर सोबतीला एक तरी मित्र असावा. मित्राशिवाय जीवन म्हणजे मिठाशिवाय भाजी जशी सपक आणि बेचव लागते अगदी तसेच आहे. ‘मित्र/मैत्रीण कसे असावेत?’ या प्रकरणात लेखकाने मित्राचे खूप छान वर्णन केले आहे. चांगले मित्र मिळणे ही खरी संपत्ती आहे. मित्रांमुळे जीवन सुधारू शकते तर त्यांच्यामुळे बिघडूही शकते. आपली ओळख ही आपल्या मित्रपरिवारावरून केली जाते. म्हणून मित्रांची निवड करताना काळजी घेणे आवश्यक आहे.

आजकालच्या मुलामुलींत सैराट प्रेम वाढीस लागले आहे. म्हणून क्षणभंगुर प्रेमाच्या जाळ्यात न पडता या वयात अभ्यास करणे व यश मिळविणे आवश्यक आहे. त्याच कामावर फोकस करण्याचा मार्मिक सल्ला ‘आभासी प्रेमाचे मृगजळ’ या प्रकरणात सविस्तरपणे मांडले आहे. एखादा व्यक्ती दिसायला खूप सुंदर दिसतो पण मनाने तो तितकाच सुंदर असेल असे ठामपणे सांगता येत नाही. ‘ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा। काय भुललासी वरलिया रंगा?’ या ओळीनुसार कुणाच्याही वरवर दिसण्यावर न जाता त्याचे चारित्र्य, गुण पाहायला हवेत. उत्तम चारित्र्य हाच जीवनाचा पाया आहे. आपल्याकडे किती पैसा आहे? यापेक्षा आपले चारित्र्य किती चांगले आहे? हे अत्यंत महत्त्वाचे आहे.

-ना. सा. येवतीकर,
धर्माबाद, मोबा. : ९४२३६ २५७६९

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR