27.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeलातूररयतू बाजारातील भाजीपाला विक्रेत्यांवर ‘संक्रांत’

रयतू बाजारातील भाजीपाला विक्रेत्यांवर ‘संक्रांत’

लातूर : प्रतिनिधी
शहरात रयतू बाजार अशी ओळख असलेल्या दयानंद गेट ते संविधान चौकापर्यंतच्या जुने रेल्वे लाईनच्या रस्त्यावरील भाजीपाला, फळे व इतर छोट्या-छोट्या व्यवसायिकांना अतिक्रमणाच्या नावाखाली लातूर शहर महानगरपालिका व लातूर शहर पोलीस वाहतूक शाखेच्या वतीने दि. १४ जानेवारी रोजी हटविण्यात आले. मकरसंक्रांतीच्या सणामुळे बाजारपेठेत मोठी रेलचेल असतानाच मनपाने ही कारवाई केल्याने भाजीपाला, फळ विक्रेत्यांवर ‘संक्रांत’ कोसळली.
लातूर शहर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने रयतू बाजार उठवला. रस्त्यावरील भाजीपाला,फळ, शहाळे, फुले, क्रॉकरी, राईस, वडापाव, भेळ, पाणीपुरी आदींसोबतच इतरही छोटे-छोटे व्यवसाय करणा-यांना हटवले. गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्यावर कायमस्वरुपी ओटे बांधून, तंबु ठोकुन भाजीपाला, फळे विक्रले जात होते. दररोज सकाळी आणि संध्याकाळी या रयतू बाजारात मोठी गर्दी होत असे. हा संपूर्ण परिसर भाजीपाला विक्रेत्यांनी व्यापून टाकला होता. याच ठिकाणी शेतकरी आपल्या छोट्या वाहनातून भाजीपाला आणुन विकत होते. महानगरपालिका व पोलिसांनी मकर संक्रांतीचा मुहूर्त साधून रयतू  बाजार उठवला.
आठ दिवसांपूर्वी गंजगोलाईतील अतिक्रमण काढण्यात आले. सर्व हातगाडे, भाजीपाला विक्रेत्यांना गंजगोलाईतून हटविण्यात आले. त्यांना नवयुग सिनेमा थिएटरच्या परिसरात महानगरपालिकेच्या दोन प्लॉटमध्ये जागा देण्यात आली. परंतू, व्यवसायाच्या दृष्टीने ती जागा योग्य नसल्याच्या कारणावरुन एकही भाजीपाला विक्रेता त्या जागेवर जात नाही. सर्वांनी आपापल्या परिने गंजगोलाईतच व्यवसाय सुरु केला आहे. बहुतांश हातगाडीवाल्यांनी मस्जिद रोडवर व्यवसाय सुरु केल्याने या रोडवर चालणेही शक्य नाही, एवढी गर्दी होत आहे. आता रयतू बाजार उठवल्यानंतर तेथील व्यवसायिकांचे पुनर्वसन कुठे करणार, हे अद्याप निश्चित झालेले नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR