नवी दिल्ली : वृत्तसंस्था
रविवारी होणारी नीट पीजी परीक्षा पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय आरोग्य मंत्रालयाने घेतला आहे. उद्या नीट पीजी परीक्षा पार पडणार होती. मात्र, ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. नीट परीक्षेचा मुद्दा गेल्या ब-याच दिवसांपासून चर्चेत आहे. अलिकडेच नीट परीक्षेत घोळ झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर नीट पीजी परीक्षा रद्द करण्याची मागणी करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर खबरदारी घेत शिक्षण विभागाने रविवारी होणारी नीट पीजी परीक्षा पुढे ढकलली.
खबरदारीचा उपाय म्हणून नीट पीजी परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली. परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल, अशी माहिती शिक्षण मंडळाने दिली. आरोग्य मंत्रालयाने याबाबत अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी करताना म्हटले की, काही स्पर्धात्मक परीक्षांमध्ये घोळ झाल्याच्या आरोपांच्या अलीकडील घटना लक्षात घेऊन आरोग्य मंत्रालयाने वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय परीक्षा मंडळाद्वारे आयोजित केलेल्या नीट-पीजी प्रवेश परीक्षेच्या प्रक्रियेच्या मजबूततेचे सखोल मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार खबरदारीचा उपाय म्हणून उद्या म्हणजेच २३ जून २०२४ रोजी होणारी नीट-पीजीप्रवेश परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांना झालेल्या गैरसोयीबद्दल आरोग्य मंत्रालय मनापासून दिलगीर आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि परीक्षा प्रक्रियेचे पावित्र्य राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
एनटीए डीजी सुबोध
कुमार यांची हकालपट्टी
नीट परीक्षेत हेराफेरी आणि पेपर लीक प्रकरणी कारवाई करीत केंद्र सरकारने एनटीए डीजी सुबोध कुमार यांना पदावरून हटविले आहे. रविवारी २३ जून रोजी होणारी नीट-पीजी प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आली. त्यातच एनटीए डीजींवर कारवाई केल्याने संशयाची सुई तिथेच फिरत आहे.