बारामती : विशेष प्रतिनिधी
बारामती हा शरद पवारांचा बालेकिल्ला मानला जातो आणि सध्या अजित पवार येथून आमदार आहेत. बारामती आणि महाराष्ट्राच्या राजकारणापासून अलिप्त असलेल्या युगेंद्र पवारांची राजकारणात एन्ट्री करुन पवार हे देशातले दुसरे मोठे कुटुंब समजले जाईल, ज्यांचे सर्वात जास्त सदस्य राजकारणात असतील.
उत्तर प्रदेशामध्ये मुलायम स्ािंह यांच्या कुटुंबातील १० सदस्य अजूनही राजकारणात आहेत. मुलायम यांचे चिरंजीव अखिलेश यादव हे खासदार आहेत. अखिलेश यांच्या पत्नी डिंपल ह्या मैनपुरीच्या खासदार आहेत. अखिलेश यांचे काका शिवपाल हे जसवंतनगरचे आमदार आहेत. शिवपाल यांचे चिरंजीव आदित्य यादव बदायूंचे खासदार आहेत.
अखिलेश यांचे आणखी एक काका रामगोपाल यादव राज्यसभा खासदार आहेत. रामगोपाल यांचे चिरंजीव अक्षय यादव फिरोजाबादचे खासदार आहेत. अखिलेश यांचे आणखी एक चुलत भाऊ धर्मेंद्र यादव आझमगडचे खासदार आहेत. मुलायम सिंह यांची दुसरी सून अपर्णा यादव ह्या भाजपसोबत काम करत आहेत. अपर्णा यांना उत्तर प्रदेश महिला आयोगाच्या उपाध्यक्षपदी नियुक्त केले आहे. अखिलेश यांचे एक चुलत भाऊ अंशुल यादव हे इटावाचे जिल्हाप्रमुख आहेत. मुलायम यांचे नातू तेज प्रताप हे सुद्धा मैनपुरीचे खासदार होते.
बिहारच्या लालू यादव यांच्या कुटुंबातले ६ लोक सध्या सक्रीय राजकारणात आहेत. लालू यादव स्वत: आरजेडीचे सर्वेसर्वा आहेत. त्यांची पत्नी राबडी देवी बिहार विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्या आहेत. तेज प्रताप हसनपूरचे आमदार आहेत. तेजस्वी यादव आमदार आणि विरोधी पक्षाचे नेते आहेत. लालू यांची मोठी मुलगी मीसा भारती सध्या पाटलीपुत्रची खासदार आहे. दुसरी मुलगी रोहिणी आचार्य यांनी निवडणूक लढली आहे.
माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या कुटुंबातील सहा सदस्य राजकारणात सक्रीय आहेत. माजी पंतप्रधान देवेगौडा हे स्वत: राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांचे चिरंजीव एच.डी. कुमारस्वामी केंद्रात मंत्री आहेत. त्यांचे दुसरे चिरंजीव एच.डी. रेवन्ना आमदार आहेत.
एच.डी. रेवन्ना यांचे दोन मुलं सुरज आणि प्रांज्वल राजकारणात आहेत. सूरज एमएलसी तर प्रांज्वल लोकसभा सदस्य होते. एच.डी. कुमारस्वामींचे चिरंजीव निखिल हे सुद्धा राजकारणात असून निवडणूक लढवलेले आहेत.
शरद पवार कुटुंबातून ……
शरद पवार यांच्या कुटुंबातून खुद्द शरद पवार, पुतणे अजित पवार, मुलगी सुप्रिया सुळे, नातू रोहित पवार, पार्थ पवार, सुनेत्रा पवार हे राजकारणात आहेत. त्यानंतर आता युगेंद्र पवार हे अजित पवारांचे पुतणे राजकारणात येत आहेत. जर बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार निवडणूक लढवणार नसतील तर एनसीपी (शरद पवार) युगेंद्र पवारांना मैदानात उतरवू शकते.