25.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रराजकोट पुतळा दुर्घटनेचे राजकीय भांडवल करू नये

राजकोट पुतळा दुर्घटनेचे राजकीय भांडवल करू नये

सातारा : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटना निश्चितच दुर्दैवी आणि अचानक घडलेली (ऍक्सिडेंटल) आहे. देशातील सर्व जाती-धर्मातील नागरिकांना याचे दु:ख आहे. या घटनेचे कोणी स्वत:च्या लाभासाठी राजकीय भांडवल करू नये, असे आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केले आहे.
दरम्यान, पुतळा उभारणीतील कच्चा दुवे आणि निसर्गाची अवकृपा या कारणांमुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचे समोर येत आहे.

समाजाने संयम बाळगावा. या प्रकरणातील दोषींना कठोर शासन झाले पाहिजे. समुद्रतटीय हवामान बदलांचा पुरेपूर अभ्यास करून, छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी पुतळा पुन्हा त्याच ठिकाणी उभारला जावा, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.

या पत्रकात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अलौकिक कार्याचा तमाम देशवासीयांना अभिमान आहे. त्यांची शिकवण आणि राज्यकारभार आजही उपयुक्त आहे. त्यांचे अतुलनीय कार्य दीपस्तंभासारखे आहे. राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळल्याची दुर्घटना निश्चितच प्रत्येकासाठी क्लेशदायी आणि निषेधार्ह आहे.
मात्र, या घटनेचे भांडवल करणा-यांकडून सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारी कृत्ये होत असतील, तर शिवविचारांचा पाईक असलेल्या कोणालाच ते मान्य होणार नाही. या घटनेच्या चौकशीमध्ये जे दोषी ठरतील, त्यांना कठोर शासन व्हावे. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा त्याच ठिकाणी पुन्हा दिमाखात उभारला गेला पाहिजे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR