इराणने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर दक्षता
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राजधानी नवी दिल्लीतील इस्रायली दूतावासाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. अब्दुल कलाम रोड बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांच्या वाहनांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मीडियालाही इस्रायली दूतावासात जाऊन व्हिडिओग्राफी करण्याची परवानगी दिली जात नाही. इराणने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर मध्य-पूर्वेत तणावाचे वातावरण आहे. अशा स्थितीत भारतातील इस्रायल दूतावासात कोणताही कट होऊ नये, म्हणून दिल्लीत बंदोबस्त वाढविण्यात आला.
या भागात कोणत्याही प्रकारचा निषेध होऊ नये, यासाठी दिल्ली पोलिसांनी इस्रायल दूतावासाची सुरक्षा व्यवस्था वाढवली असून दूतावासाकडे जाणारा रस्ता बंद केला आहे. दिल्लीतील इस्रायली दूतावासाजवळ गेल्या काही वर्षांत दोनदा संशयास्पद आयईडी स्फोट झाले आहेत. मध्य-पूर्वेतील युद्धाची स्थिती वाढत असताना भारताने इस्रायल आणि इराणमध्ये राहणा-या भारतीयांसाठी अॅडव्हायजरी जारी केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने एक सूचना जारी करून भारतीय लोकांना इराणमध्ये सर्व अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. यापूर्वी परराष्ट्र मंत्रालयाने इस्रायलमध्ये राहणा-या भारतीयांसाठी अॅडव्हायजरी जारी केली होती. परराष्ट्र मंत्रालयाने भारतीयांना सुरक्षा प्रोटोकॉल पाळण्याचा सल्ला दिला होता.
डेन्मार्कमध्ये इस्रायली
दूतावासाबाहेर स्फोट
इराणने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर जगात वातावरण बदलले असून, डेन्मार्कची राजधानी कोपनहेगनमध्ये इस्रायली दूतावासाबाहेर बॉम्बस्फोट झाला. डॅनिश पोलिसांनी सांगितले की, ते प्रकरणांचा तपास करत आहेत. या घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याचे कोपनहेगन पोलिसांनी सांगितले.