18.6 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमुख्य बातम्या‘राज’वाणी नंतर, शिंदे-अजित पवारांची वाढली धाकधूक!

‘राज’वाणी नंतर, शिंदे-अजित पवारांची वाढली धाकधूक!

मुंबई : प्रतिनिधी
निवडणूक निकालानंतर विजयाचा दावा करत मनसे भाजपसोबत सत्तेत जाण्याचा विश्वास राज ठाकरेंनी व्यक्त केला. त्यामुळे आता मनसेने भाजप किंवा शिंदेंच्या शिवसेनेविरोधात उमेदवार दिलेले असले तरी आपण निकालानंतर भाजपसोबत सत्तेत असू किंवा आमच्या साथीनेच भाजपचा मुख्यमंत्री बनेल. अशी भविष्यवाणी राज ठाकरेंनी बोलून दाखविली. दुसरीकडे त्यांचे पुत्र अमित ठाकरेंनी मात्र मनसेच्या १०० जागा निवडून येण्याचा विश्वास व्यक्त केला. यानंतर मनसे-भाजपची युती होवून शिंदे आणि अजितदादा गटाचे भविष्य अंधातंरी राहिल याकडेही त्यांनी बोट दाखवले.
मागच्या काही सभांमधून राज ठाकरे भाजपवर का टीका करत नव्हते, त्याचंही उत्तर मनसेच्या भूमिकेतून मिळाले. राज ठाकरे म्हणाले की, महाविकास आघाडीसोबत आम्ही जाणार नाहीत. शिवसेनेत असताना माझा सर्वाधिक संबंध भाजपशीच आला. सरकार महायुतीचं बनणार, ३ महिन्यापूर्वी मविआचं सरकार येणार असं वाटत होतं. पण हरियाणाच्या निकालानंतर थोडं चित्र बदललं आहे, मात्र महायुतीला इतकं सोपंही नाही.
मुख्यमंत्री भाजपचा होईल, आणि मनसे सत्तेत असेल.  लोकसभेत शिंदेंनी मनसेला धनुष्यबाणावर लढण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र मी शिंदेंसारखा पक्ष किंवा चिन्ह ढापलेला नाही, त्यामुळे नकार दिला होता, असेही ते म्हणाले.
दरम्यान भाजपसोबत सत्तेत जाण्याचा दावा करणा-या मनसेनेच भाजपच्या अनेक धोरणांवर आसूड का ओढले, या प्रश्नावर लोकांनी मनसेला स्वबळावर सत्ता द्यावी, असे अमित ठाकरे म्हणाले.
मनसेच्या या भूमिकेनंतर काही महत्वाचे प्रश्नही विचारले जात आहेत. ते म्हणजे २०१९ निवडणुकीआधी एकमेकांविरोधात लढून नंतर एकत्र आलेल्यांना राज ठाकरे राजकारणाचा चिखल म्हणतात. पण आता मनसेनं स्वत: भाजपविरोधातही अनेक उमेदवार दिले आहेत, आणि त्यांच्या दाव्यानुसार निकालानंतर मनसेच्या मदतीनें भाजप सत्तेत असणार आहे. अर्ज भरताना अमित ठाकरेंनी राजकीय चिखलावरुन महायुतीसह-मविआविरोधात मनसेला कौल देण्याचं आवाहन करत मनसे स्वबळावर सत्तेत येण्याचा दावा केला होता, आता त्याच अमित ठाकरेंनी भाजपसोबत सत्तेचा विश्वास व्यक्त केला.
पुण्यात आनंद दवेंनी कसबा मतदारसंघात भाजपविरोधात मनसेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची तयारी केली होती. पण आता मनसेनेच निकालानंतर भाजपसोबत सत्तेचा विश्वास व्यक्त केल्यानंतर राजसाहेब म्हणतील तीच भूमिका असे म्हणत त्यांचाही भाजपविरोध मावळला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR