22.2 C
Latur
Thursday, July 25, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यभरात सरकारविरोधात काँग्रेस आक्रमक

राज्यभरात सरकारविरोधात काँग्रेस आक्रमक

नागपूर, पुणे, अकोला, अमरावतीसह इतरत्र काँग्रेसचे चिखलफेक आंदोलन

मुंबई : प्रतिनिधी
राज्यभरात २१ जून रोजी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहे. काँग्रेसने शुक्रवारी राज्यभरात भाजप आणि महायुतीच्या सरकारचा विरोध दर्शवत रस्त्यावर उतरून निदर्शने केली आहेत. नागपूर, पुणे अकोला, अमरावती इत्यादीसह राज्यातील विविध शहरांमध्ये काँग्रेसने रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध नोंदविला. या आंदोलनाला काँग्रेसने ‘चिखलफेक’ आंदोलन असे नाव दिले आहे. ‘नीट’च्या परीक्षेसंदर्भात जो काही भ्रष्टाचार झाला त्याची चौकशी व्हायला पाहिजे, अशी काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी आहे.

दरम्यान, राज्यभरात काँग्रेस रस्त्यावर उतरून सरकारविरोधात ‘चिखलफेक’ आंदोलन करत आहे. नागपुरातील व्हेरायटी चौकात काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्ता अडवून तीव्र निषेध नोंदवला. यावेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली. काँग्रेसचे नेते विकास ठाकर यांच्या नेतृत्वात नागपुरातील व्हेरायटी चौकात या आंदोलनाला सुरुवात झाली. यावेळी शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरून भाजपचा निषेध करत आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी चिखल फेकावे असेच काम केले आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे नेते विकास ठाकरे यांनी टीका केली आहे. राज्यात शेतकरी, बेरोजगार आणि विद्यार्थ्यांची कुचंबणा होत आहे. सध्याचे सरकार हे जनताविरोधी आहे. म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस नेतृत्वाने या आंदोलनाला चिखलफेक आंदोलन असे नाव दिले असल्याचेही विकास ठाकरे म्हणाले.

या वेळी नाना पटोले म्हणाले, मला, काँग्रेसला बदनाम करायचा प्रयत्न केला गेला आहे. भाजप शेतक-याचा अपमान जाणूनबुजून करत आहे. एमएसपी सरकारने जाहीर केली आहे. आज माझा मोदीजींना सवाल आहे, तुम्ही जी महागाई वाढवली त्यानुसार शेतक-याने १ रुपया खर्च केला तर त्याला चाराने पण वाचत नाहीत. काँग्रेस पक्षाने शेतक-यांचे अश्रू पुसण्यासाठी शेतक-यांच्या बांधावर जाऊन त्यांचे अश्रू पुसले. तर दुसरीकडे २०१६ ला शिवाजी महाराजांच्या नावाने योजना काढली. परंतु अद्याप त्यावर काही झाले नाही. फुलेंच्या नावाने योजना काढली, पण अद्याप त्याचे ५० हजार शेतक-यांना मिळाले नाहीत. आमचे सरकार करणार होते पण कोरोना काळ आला आणि नंतर हे खोके सरकार आले. त्यामुळे ५० हजार मिळाले नाहीत, अशा शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी सरकारवर घणाघात केला आहे.

अकोल्यात आंदोलन
राज्यातील जनता अनेक समस्यांचा सामना करत असताना महाभ्रष्ट युती सरकार त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतेय. या सरकारने जनतेला वा-यावर सोडून दिले आहे, असा आरोप काँग्रेसने अकोल्यात चिखलफेक आंदोलनदरम्यान केला. सरकारच्या प्रतिमेस चिखल लावून ‘चिखलफेक’ आंदोलन करण्यात आले.

आंदोलनाचे यवतमाळातही पडसाद
महायुती सरकारविरोधात काँग्रेसकडून आज यवतमाळच्या बसस्थानक चौकात चिखलफेक आंदोलन करण्यात आले. महाभ्रष्ट महायुती सरकार हे शेतकरीविरोधी सरकार असल्याचा आरोप करत काँग्रेसकडून केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रतीकात्मक पोस्टरला चिखल फासून निषेध करण्यात आला आहे. या आंदोलनात काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते.

जळगावात भ्रष्टाचार, पेपरफुटीकडे लक्ष
देश व राज्यात पेपरफुटीचे वाढते प्रमाण, नोकर भरतीला ब्रेक, शेतमालाला भाव न मिळणे, खते व बियाणांचा काळाबाजार, शेतक-यांची कर्जासाठी होणारी अडवणूक आदी मुद्दे घेऊन जिल्हा काँग्रेस पक्षाने शुक्रवारी दुपारी महायुती सरकारवर चिखलफेक केली.

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘चिखलफेक’

पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसच्या वतीने पिंपरीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक येथे युती सरकारच्या विरोधात प्रतीकात्मक चिखलफेक आंदोलन करण्यात आले. अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते व पदाधिका-यांनी सरकारविरोधात निदर्शने केली. महागाई, बेरोजगारी, पेपरफुटी, महिला सुरक्षा, खते, बियाणांचा काळाबाजार, चिखलात सुरू असलेली पोलिस भरती, राज्यातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था, श्रीमंतांची पोरं गोरगरिबांना गाड्याखाली चिरडून मारत आहेत, असे आरोप करण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR