14.7 C
Latur
Wednesday, January 8, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यातील तापमानात वाढ

राज्यातील तापमानात वाढ

मुंबई : प्रतिनिधी
नवीन वर्षात महाराष्ट्रातील अनेक भागात हुडहुडी भरवणारी थंडी पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला होता. मात्र, हवामान विभागाने दिलेल्या नव्या माहितीनुसार, पुढील तीन दिवसांमध्ये तपमानाच्या पा-यात वाढ होणार आहे. त्यामुळे नागरिकांना हिवाळ्यातही उन्हाळा असल्यासारखा त्रास सहन करावा लागणार आहे. राज्यात येत्या तीन दिवसांत तापमानात वाढ होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, राज्यातील तापमानात आणि वातावरणात गेल्या काही दिवसांपासून विविध बदल पाहायला मिळत आहेत. रात्री जरी थोडीफार थंडी जाणवत असली तरी दिवसभर मात्र चांगलाच उकाडा जाणवतो. गेल्या २४ तासांमध्ये मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सामान्य तापमानाच्या तुलनेत अधिक तापमान नोंदवले गेले आहे.

ज्यामुळे उकाडा वाढला आहे. तर, कोकण, विदर्भातही १ ते ३ अंशांनी तापमानात वाढ झाली होती. आता जरी उत्तरेकडे थंडीची लाट असली तरी येत्या काही दिवसांमध्ये दक्षिणेकडील काही राज्यांसह उत्तरेतील जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पण महाराष्ट्रात येत्या तीन दिवसांत तापमान कोरडे राहणार असले तरी २ ते ४ अंशांनी वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.

मुंबईत दोन दिवसांपूर्वी उकाड्याने हैराण केल्याचे पाहायला मिळाले. कारण ऐन हिवाळ्यामध्ये मुंबईत २५ अंशापेक्षा जास्त तपमानाची नोंद करण्यात आली आहे. पण नवीन वर्षाच्या स्वागतावेळी मुंबईकरांना गुलाबी थंडी अनुभवायला मिळू शकते, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले होते, मात्र नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना उकाड्याने हैराण केले.

नववर्षानिमित्त बाहेर फिरण्यासाठी निघालेल्या मुंबईकरांना घामांच्या धारांनी भिजवले. त्यामुळे नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईकर उकाड्याने हैराण झाल्याचे पाहायला मिळाले. तर, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये ७ ते ८ अंश तापमानाची नोंद करण्यात आली होती. मात्र, आता हेच तपमान १९ ते २० अंशावर गेले आहे.

किमान तापमानात होणार घट
सांगली, सातारा तसेच बहुतांश मध्य महाराष्ट्रात किमान तापमानाचा पारा १७ ते १९ अंशांवर जाऊन पोहोचला होता. कोकण, मध्य महाराष्ट्रात कमाल तापमानात येत्या चार ते पाच दिवसांत १ ते २ अंशांनी वाढ होणार असून किमान तपमान २-४ अंश सेल्सियसने कमी होणार आहे. विदर्भात कमाल तापमानात फारसा बदल होणार नाही. तर किमान तापमानात येत्या २४ तासांमध्ये ४ ते ५ अंशांनी घट होणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR