पुणे : प्रतिनिधी
राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र (विशेषत: घाटमाथा), मराठवाडा आणि विदर्भातील तुरळक ठिकाणी ३ नोव्हेंबरपर्यंत वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून दक्षिण-पूर्व बंगालचा उपसागर ते दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीपर्यंत चक्रीय स्थिती कार्यरत आहे. त्यामुळे या भागाकडून राज्याकडे बाष्पयुक्त वारे वाहत आहेत. परिणामी, कोकणसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसेच विदर्भाच्या काही भागांत वादळी वारे, मेघगर्जना तसेच विजांच्या कडकडाटात हलका, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे.
गेल्या चोवीस तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. दरम्यान, हा पाऊस ३ नोव्हेंबरपर्यंत राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, सध्या ऑक्टोबर हीटचा तडाखा काहीसा कमी झाला असून, सकाळच्या वेळी थंडी जाणवत आहे. तसेच धुकेही पडत आहे. पाऊस कमी होताच थंडीचा कडाका वाढणार आहे.