30.8 C
Latur
Sunday, May 26, 2024
Homeसंपादकीय विशेषराम गावा, राम घ्यावा, राम जीवाचा विसावा...

राम गावा, राम घ्यावा, राम जीवाचा विसावा…

भारतात सगळ्या प्रदेशात सर्व स्तरांत रामनवमीचा उत्सव अतिशय आनंदाने साजरा केला जातो. नवमी शब्दाचा अर्थ नववा दिवस असा नसून या शब्दामध्ये मोठा आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे. आपल्या ज्या अष्टधा प्रकृती आहेत त्या आणि मन हे वसंत ऋतूतल्या पालवीसारखे असून जो आपल्या जीवनात हळुवारपणे अंकुर फुलवतो त्याला रामनवमी असे म्हणतात. रामाच्या आदर्शाने जेणेकरून आमचे जीवन कृतार्थ होते, मानवी जगण्याचा एक परिपूर्ण आकार निर्माण होतो आणि या परिपूर्ण आकाराला रामनवमी असे म्हणतात. राम हा स्वयंभू आणि स्वतंत्र आहे. तो जगण्याचा विवेक आहे. पुरुषार्थाचे उत्कृष्ट भान आहे. संसाराला सुंदरता देणारा आहे. म्हणून समर्थ रामदासांनी एका उत्कृष्ट अभंगात ‘राम गावा, राम घ्यावा, राम जीवाचा विसावा’ असे म्हटले आहे.

ू श्रीरामचंद्र हे भारताचे सर्वांत महत्त्वाचे व थोर दैवत आहे. या अर्थाने त्यांना मर्यादापुरुषोत्तम असे म्हणतात. कारण आपली कर्तव्ये चोखपणे पाळणारा पण ती पाळताना कधीही सुसंस्कृतपणा, चारित्र्याच्या मर्यादा न ओलांडणारा, आपल्या चारित्र्याच्या सीमा उत्कृष्टपणे पार करणारा असे त्यांचे व्यक्तिमत्त्व आहे. या ठिकाणी मर्यादा ही अडचण नाही तर सुसंस्कृत, सुंदर भारताची ती द्योतक आहे. पुरुषोत्तमत्व हे केवळ गुणांनी मंडित नसून पूर्ण कर्तव्य आणि कठोर निर्णय या त्रिमितीय पुरुषोत्तमाने साकारले आहे. अशा प्रकारच्या त्यागाची मर्यादा ज्याने सांभाळली तो मर्यादापुरुषोत्तम होय. म्हणून रामाला आपण मर्यादा पुरुषोत्तम म्हणतो, तर कृष्णाला पूर्ण पुरुष म्हणतो. कृष्णाने प्रत्येक कामाला पूर्णत्वाकडून पूर्णत्वाकडे नेले; तर रामाने आपल्या कर्तव्याच्याही पूर्णत्वाच्या मर्यादा मर्यादांसकट पूर्ण केल्या. असा हा सूक्ष्म फरक यांमध्ये आहे. राम आणि कृष्ण हे समग्र विश्वरूपच आहेत. रामाने आपल्या आदर्श राज्यामधून जे राष्ट्रीय चारित्र्य निर्माण केले ते सगळ्या जगाला प्रसाद म्हणून दिले. म्हणूनच भारतात सगळ्या प्रदेशात रामनवमीचा उत्सव अतिशय आनंदाने साजरा केला जातो. नवमी शब्दाचा अर्थ नववा दिवस असा नसून या शब्दामध्ये मोठा आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे. आपल्या ज्या अष्टधा प्रकृती आहेत त्या अधिक मन हे वसंत ऋतूतल्या पालवीसारखे असून जो आपल्या जीवनात हळुवारपणे अंकुर फुलवतो त्याला रामनवमी असे म्हणतात. हे रामनवमी साजरी करण्यामागचे मुख्य कारण होय. रामाच्या आदर्शाने जेणेकरून आमचे जीवन कृतार्थ होणे, मानवी जगण्याचा एक परिपूर्ण आकार निर्माण होणे या परिपूर्ण आकाराला रामनवमी असे म्हणतात.

राम हा प्रखर तेजाचे प्रतीक आहे. प्रखर तेज म्हणजे भाजून काढणारा नाही, तर यापैकी एक म्हणजे ज्ञानाचे प्रखर तेज व दुसरे म्हणजे सेवाव्रतातून निर्माण झालेले तेज होय. म्हणूनच या रामाच्या तेजाला सूर्याचा वंश आहे. त्यासाठी राम हा सूर्यवंशी घराण्यातील मानला जातो. रामनवमीचा उत्सव भारतभर विविध प्रकारे साजरा केला जातो. महाराष्ट्रात सुंठवड्याचा प्रसाद वाटला जातो. रामाचा मोठ्या उत्साहात रथ निघतो. रामनवमीला मोठमोठ्या जत्राही भरतात. उत्तर भारतात तुलसीदासांच्या रामचरित मानसगानाची पारायणे झोपड्यांपासून महालापर्यंत वाचली जातात. गोस्वामी तुलसीदासांचे रामायण जसे महाराष्ट्रात महत्त्वाचे आहे, तसे हे रामायण उत्तर भारतात महत्त्वाचे आहे. तेथे घराघरांत रामजन्म साजरा केला जातो. श्रीरामांची पूजा केली जाते. उत्तर भारतात या दिवशी मालपोह्यांचा नैवेद्य असतो. महाराष्ट्रात टरबूज, खरबूज रामाला वाहिले जाते आणि उपवास केला जातो. उत्तर भारतातही काही ठिकाणी उपवास केला जातो; पण जास्तीत जास्त गोड पदार्थ या दिवशी केले जातात. बिहारमध्येदेखील रामायणाची पारायणे होतात. मध्य प्रदेशात रामकथा चालते.

काही ठिकाणी रामलीलाही होतात. खास करून अयोध्येकडचे काही गट येथे रामलीला करायला येतात. अहिल्यादेवींनी जिथे जिथे घाट बांधले आहेत तिथे तिथे मांडव घालून रामलीला त्या ठिकाणी साजरी होते. लाखो भाविक यावेळी तेथे येतात आणि ते इतके भावपूर्ण होतात की आपली सगळी सुखदु:खे रामकथेत रुपांतरित करतात. त्यातून त्यांना जो सात्विक आनंद मिळतो तो त्यांना खूप महत्त्वाचा वाटतो. ओडिशामध्ये देखील रामकथा साजरी होते. बंगालमध्येही रामकथेचे नवरात्र असते. रामायणाचे पाठ होतात. तेथे विशेषत: वाल्मिकी रामायण वाचले जाते. थेट काश्मीरपर्यंत ही पारायणे वाचली जातात. ज्यांच्यामध्ये रामायण वाचण्याची ताकद असते ते यामध्ये रामजन्माचे अध्याय आणि सुंदरकांडाचे अध्याय वाचतात. तसेच ठिकठिकाणी रामलीलेचे जाहीर कार्यक्रमही करतात. काही ठिकाणी रामचरितमानसचेदेखील मोठ्या प्रमाणात वाचन होते. कथेला जाताना रोज एक गोड पदार्थ घेऊन जाण्याची प्रथा आहे. हा पदार्थ प्रसाद म्हणून एकमेकांना दिला जातो. हा प्रसाद एकप्रकारची समता आणतो. परस्परांना भेटणे ही कृती बंधुता आणते आणि मी उत्कृष्ट कर्तव्य करेन हे स्वातंत्र्य असते. रामायणाने ही तीनही मूल्ये अशा प्रकारे आपल्याला शिकवलेली आहेत.

दरवर्षी दिल्लीमध्ये मोठा रामलीला उत्सव साजरा होतो. देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती या उत्सवात सामील होतात. महाराष्ट्रातदेखील हा उत्सव परंपरेने साजरा होतो. वारकरी परंपरेतील लोक संत एकनाथांचे भावार्थ रामायण आवर्जून वाचतात. याशिवाय ज्ञानेश्वरीची पारायणे आणि गाथेवरची भजनेदेखील होतात. पण नाथांचे भावार्थ रामायण हे रामनवमीच्या या परंपरेतील अग्रस्थान आहे. समर्थ संप्रदायात समर्थांचे रामायण वाचले जाते. श्रीधरांच्या रामविजयाचेही पारायण होते. मराठवाड्यात तर विलक्षण प्रथा आहे. तेथे भावार्थ रामायण वाचताना हे भक्त नाशिक येथील पंचवटीपर्यंत येतात. येताना ते अनवाणी येतात. अंगावर पोती घालतात. त्याला ते वल्कले म्हणतात. रामाने ज्याप्रमाणे वनवासात आपले दिवस काढले त्याप्रमाणे ते राहतात. पंचवटीत येऊन गोदास्नान करून श्रीरामाची, लक्ष्मणाची पूजा करतात आणि हे रामायण दशमी, एकादशीला संपवतात. रामासारखे वनवासी जीवन ते २१ दिवस जगतात. दशमीच्या किंवा द्वादशीच्या दिवशी नैवेद्य दाखवून त्याचे पारणे करतात. यानिमित्ताने आपली जी सत्वस्थाने आहेत ती रिचार्ज करतात. रामकथा ही ऊर्जा देणारी कथा आहे. आपण ज्याला रामपंचायतन म्हणतो ते आपल्या जीवनाची उत्कृष्ट पाच मूल्ये आहेत. राम म्हणजे ज्ञान, लक्ष्मण म्हणजे कर्तव्य, जानकी म्हणजे वैराग्य, भरत म्हणजे भक्ती, शत्रुघ्न म्हणजे प्रेम आणि हनुमान म्हणजे अखंड दास्य किंवा सेवा. जीवनामध्ये ही पाचही मूल्ये आज कुठल्याही कॉर्पोरेट वर्ल्डमध्येदेखील मोलाची आहेत. जगण्याची संपन्नता गलेलठ्ठ पगारात कधीही नसते. जगण्याची संपन्नता ही जगण्याला आपण किती श्रेष्ठ मूल्य प्राप्त करून देतो यावर असते.

रामकथेचे हे सामर्थ्य आहे की रामकथेने माणसे जोडली, नात्याला विचार दिले आणि जगण्याला अर्थ दिला. जगणे सतत विनम्र असावे. ते अहंकारापासून दूर असावे. यातून जगण्याची अर्थपूर्णता सामाजिक भान देणारी असावी ही शिकवण रामायण देते. म्हणून श्रीराम हे केवळ फक्त हिंदू धर्मियांपुरते दैवत नाहीत, तर ते अनेक धर्मांनी आणि संप्रदायांनी स्वीकारलेले दैवत आहे. संत कबीर हे श्रीरामांचे थोर भक्त होते. कबीराचे शेले श्रीरामांनी विणले हे आम्ही आवर्जून सांगतो. रहीम नावाचा मुसलमान संत रामभक्त होता. अनेक सूफी संत, फकीर, मलंग श्रीरामांचे भक्त आहेत. याचा अर्थ हे भक्त आहेत म्हणून राम मोठे आहेत असा नाही, तर श्रीराम हे मुळातच विश्वदेव आहेत. राम या शब्दाचा अर्थच चैतन्य असा होतो. विश्वाचे सगळे चैतन्य श्रीरामांमध्ये आहे. चैतन्य आहे म्हणूनच आपण आहोत. शरीरातील चैतन्य संपले की राम बोलायची आठवण येते. रामांनी आमच्या जगण्याला कर्तव्याचा गाभारा दिला आणि सेवेचे तोरण दिले. म्हणूनच आजही ग. दि. मांचे गीतरामायण मराठी मनावर मोहिनी घालून आहे. अनेक मराठी संतांनी रामकथा आपल्या प्रतिभेतून फुलवल्या. पंडित कवी मोरोपंतांनी तर १०८ वेळा आपल्या कवितेतून रामायण लिहिले आणि त्यांच्या प्रत्येक रामायणातील राम हा स्वयंभू आणि स्वतंत्र आहे. तो जगण्याचा विवेक आहे. पुरुषार्थाचे उत्कृष्ट भान आहे. संसाराला सुंदरता देणारा आहे. म्हणून समर्थ रामदासांनी एका उत्कृष्ट अभंगात ‘राम गावा, राम घ्यावा, राम जीवाचा विसावा’ असे म्हटले आहे. श्रीराम आणि सीता हे प्रपंचातले आदर्श मेहुण आहेत. असे मेहुण समर्थांना आपली संपत्ती वाटते.

राम म्हणजे जगण्यातले शिवत्व आणि सीता म्हणजे विश्वातील महाशक्ती. या शिवशक्तीच्या समावेशातून अमृतानुभव जन्माला येतो. म्हणून अनेक गावांत श्रीराम-सीतेची मंदिरे आहेत. आंध्रमध्ये, तामिळनाडूमध्ये, पूर्व दक्षिणेत रामकथा अत्यंत प्रेमाने गायिली जाते. आश्चर्य म्हणजे शैव परंपरेतसुद्धा रामकथा आदराने गायिली जाते. कारण स्वत: शिव हे रामाचे ध्यान करतात. त्यांनी दिलेला जो मंत्र आहे तो आज भारतभर प्रचलित आहे. तो मंत्र म्हणजे श्रीराम जयराम जयजय राम. श्री म्हणजे आद्य, आरंभ. जय म्हणजे इंद्रियांना जिंकणारा, राम म्हणजे चैतन्यस्वरूप, पुढचा जय म्हणजे आत्मज्ञानात रममाण होणारा, शेवटचा राम शब्द याचा अर्थ सच्चिदानंद स्वरूपाचा आनंद घेणे. या त्रयदशाक्षरी मंत्राचा असा अर्थ आहे. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी रामभक्ती पसरवली. वारकरी परंपरेने ही रामभक्ती आपलीशी मानली. श्रीराम संप्रदायात अनेक थोर सत्पुरुष होऊन गेले. इतरही प्रांतात अनेक रामभक्त झाले. गोस्वामी तुलसीदास हे तर प्रसिद्ध आहेतच. आसाममध्ये शंकर देव, ओरिसात हरे राम, आंध्रामध्ये राघवाचार्य प्रसिद्ध आहेत. खुद्द समर्थ रामदासांनी आपल्या शिष्यांना तजांवर मठ काढण्याची आज्ञा दिली. या सा-याचा एकच अर्थ आहे.

एकनाथांच्या काळात यवनांचे आक्रमण झाले होते तेव्हा समाजाला चेतना देण्यासाठी एकनाथांनी भावार्थ रामायण सांगितले. समर्थ रामदासांनी महाराष्ट्रात ज्यावेळी पाच पातशाह्या राज्य करत होत्या तेव्हा लोकांनी एकत्र येण्यासाठी गावागावांत रामकथा पोहोचवली आणि गावोगावी मारुतीची मंदिरे आणि आखाडे निर्माण केले. जिथे जिथे भारतात परकीय आक्रमणे झाली तिथे तिथे रामकथा सांगितली गेली. रामकथेने समाज एकसंध निर्माण केला. समाजाला चेतना दिली. हे रामकथेचे सामर्थ्य आजही अवीट आहे. रामकथेने संपूर्ण भारताला एकात्मता बहाल केली. मानवता हेच रामतत्त्व आहे हे संतांनी शिकवले. माझा राम हा माझ्यासारखाच असला पाहिजे म्हणून राम सर्वांचा झाला. ज्या रामाने शबरीची उष्टी बोरे प्रेमाने खाल्ली, अहिल्येला सुंदरपण दिले, भोळ्या रामाचे घर रक्षण केले, वेणाबाईच्या कीर्तनात श्रोता होऊन आले, मीरेच्या कृष्णकथेत तर पायोजी मैने रामरतन झाले,

काश्मिरी संत मल्लेश्वरीने रामनामाचे सुंदर आकाश निर्माण केले. राम आणि कृष्ण हे एकच आहेत, हे सर्वांनीच सांगितले. संत चोखोबांनी ‘राम नाम ज्याचे चित्ती, तो नर धन्य होवो या जगती’ असे म्हटले. आजही संपूर्ण भारतात बुधकौशिक ऋषींची रामरक्षा म्हटली जाते. यातून मनाला निर्भयतेचा कणा मिळतो. आपल्या पाठीशी एक सुंदर शक्ती उभी आहे, ती आपल्याला चांगले काम करायला नेते म्हणून संसाराला सुंदरता देणारा असा हा राम म्हणजे चांगल्या प्रकल्पांचा समुच्चय आहे. समर्थ रामदासांनी रामाला १२१ नावांतून वर्णिले असून त्याद्वारे रामाचे कर्तृत्व सूचित केले आहे. आजही वधू-वरांच्या मंगलाष्टका ‘रामोराजमणिसदा विजयते’ हा रामरक्षेतला श्लोक मंगलाष्टक म्हणून गायला जातो. म्हणून राम म्हणजे मांगल्याचे मंगल करणारा, जीवनाला संजीवनी देणारा असा तो विश्वाचा आधार आहे.

-सु. ल. हिंगणे, अध्यात्म अभ्यासक

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR