नवी दिल्ली : प्रतिनिधी
धर्म हा वैयक्तिक निवडीचा विषय असून त्याचा वापर राजकीय फायद्यासाठी केला जाऊ नये. अयोध्येत मंदिर उद्घाटनाच्या निमित्ताने तोच प्रकार सुरू असल्याने निमंत्रण मिळाले असले तरी आमचा पक्ष २२ जानेवारीच्या कार्यक्रमाला जाणार नाही, असे इंडिया आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने मंगळवारी जाहीर केले. माकप पाठोपाठ डाव्या आघाडीतील भाकपसारखे पक्षही अयोध्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याची स्पष्ट चिन्हे आहेत.
माकप सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी राममंदिराच्या उद्घाटनाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण नाकारताना निमंत्रण मिळूनही ते कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत, असे म्हटले. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने एका धार्मिक कार्यक्रमाचे सरकारी कार्यक्रमात रूपांतर केले आहे. त्यात पंतप्रधान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि इतर सरकारी अधिकारी थेट सहभागी होतात, हे अतिशय दुर्दैवी आहे. भारतात राज्यकारभाराचे मूलभूत तत्त्व आहे. राज्यघटनेनुसार भारतात राज्यकारभाराला कोणताही धार्मिक संबंध नसावा. पण सत्ताधारी पक्ष त्याचे उल्लंघन करत आहे, असेही येचुरी यांनी म्हटले आहे. माकप नेत्या वृंदा करात यांनीही धर्म व राजकारणाची गल्लत केल्याचा ठपका सत्तारूढ भाजपवर ठेवला आहे.