37.7 C
Latur
Tuesday, May 21, 2024
Homeसंपादकीय विशेषराष्ट्रद्रोही तत्त्वांचा बीमोड करताना...

राष्ट्रद्रोही तत्त्वांचा बीमोड करताना…

राष्ट्रीय तपास यंत्रणेने अलीकडेच देशभरात टाकलेल्या छाप्यांमधून आणि काही महिन्यांपूर्वी केलेल्या कारवाईतून देशातील राष्ट्रद्रोही तत्त्वांचे घातक मनसुबे समोर आले आहेत. विकासाकडे वाटचाल करणा-या देशासाठी अशा प्रकारची विघातक तत्त्वे हे एक आव्हान असतात. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मानसिकतेवर, आर्थिक स्रोतांवर काम करणे गरजेचे आहे. तरच दहशतवाद, उग्रवाद, नक्षलवादाविरुद्धची लढाई जिंकता येईल.

राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच एनआयएने अलीकडेच इसिस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याच्या आरोपांवरून पुन्हा एकदा संपूर्ण देशभरामध्ये मोठी कारवाई केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ठाणे, कल्याण, भिवंडी आणि पुण्याचा समावेश आहे. काही महिन्यांपूर्वीही एनआयएने पुण्यामध्ये धाडी टाकून इसिसच्या मोड्युलनुसार देशात मूलतत्त्ववादी विचारसरणीचा प्रसार करून दहशतवादी कारवाया करण्याच्या तयारीत असणा-या काही जणांना अटक केली होती. यामध्ये पुण्यातील कोंढवा परिसरातील डॉ. अदनान अली सरकार या भूलतज्ज्ञाला ताब्यात घेतले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा एनआयएने छापे टाकल्यामुळे देशामध्ये घातपात घडवून आणण्याचे मोठे कारस्थान पडद्यामागे शिजत असल्याचे समोर आले आहे. आजघडीला देशामध्ये आतंकवादी किंवा राष्ट्रविद्रोही कृत्ये करण्याची शक्यता असणा-यांची संख्या १५ ते २० लाख इतकी प्रचंड आहे. त्यांना मदत करणा-यांची संख्या ८ ते ९ कोटींच्या आसपास आहे. इतकी मोठी लोकसंख्या युरोपातील देशांचीही नाही. ही देशविघातक तत्त्वे संपूर्ण भारतात पसरलेली आहेत. त्यांचे संबंध पाकिस्तानसह मध्य पूर्वेतील काही देशांशी जोडलेले आहेत. त्यांचा पैसा प्रामुख्याने पाकिस्तानातून येतो. सलग तीन युद्धांमध्ये पराभव पत्करावा लागल्यानंतर पाकिस्तान आपल्याशी प्रत्यक्ष युद्ध करत नसून त्यांनी अघोषित युद्ध किंवा छद्मयुद्धाचा मार्ग अवलंबला आहे.

या युद्धासाठी पाकिस्तानचे सैन्य वापरले जात नाही. त्याऐवजी पाकिस्तानशी संबंधित असणा-या भारतातील लोकांचा वापर केला जात आहे. विशेषत:, महाराष्ट्र, तेलंगणा, उत्तर प्रदेश, आसाम, बिहार आणि केरळ या राज्यातील अनेकांचा वापर यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा अभ्यास केल्यास त्याचे धागेदोरे पाकिस्तानात होते; परंतु ते कृत्य करण्यामध्ये मदत करणारे लोक हे भारतातीलच होते, महाराष्ट्रातीलच होते. त्यापूर्वी मुंबईची जीवनरेखा असणा-या लोकल रेल्वेमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले होते. त्या स्फोटांसाठी भलेही आर्थिक रसद पाकिस्तानातून पुरवली गेली असेल; परंतु प्रत्यक्षात बॉम्ब पेरणारे लोक पाकिस्तानचे नव्हते. ते दुष्कृत्य भारतातील लोकांनीच केले. पुण्यामध्ये जंगली महाराज रोडवर स्फोट घडवून आणणारेही भारताचे नागरिकच होते. जर्मन बेकरी बॉम्बस्फोट हेडलीने घडवून आणला असला तरी त्याला मदत करणारे लोक पुण्यातीलच होते. आताही एनआयएकडून जे छापे टाकले जात आहेत त्यामध्ये सापडलेल्या व्यक्ती या महाराष्ट्रात, पुण्यात राहणा-याच आहेत. या देशविघातक शक्तींना मिळणारा पैसाही महाराष्ट्रातूनच दिला जात आहे.

त्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी लागणारी सामग्री बाजारात मिळत असली तरी तो बॉम्ब बनवण्यासाठीची माहिती त्यातील तज्ज्ञाकडूनच मिळते. अशा प्रकारची माहिती देणा-यांची संख्याही भारतात, महाराष्ट्रात, पुण्यात मोठी आहे. आपण लक्षात घेतले पाहिजे की, कोरेगाव पार्कजवळ जेव्हा जनरल अरुण कुमार वैद्य यांची हत्या करण्यात आली तेव्हा त्यांना मारणारे मारेकरी हे दोन वर्षांपासून पुण्यातच राहात होते. या दोन वर्षांमध्ये त्यांना मदत कुणी केली? त्यानंतरच्या काळात गेल्या काही वर्षांमध्ये पकडण्यात आलेल्या अनेक राष्ट्रविद्रोही तत्त्वांचे धागेदोरे महाराष्ट्राशी, पुण्यातील कोंढवा परिसराशी जोडलेले असल्याचे दिसून आले. याचा अर्थ राष्ट्रद्रोही तत्त्वांना मदत करण्याची ही मानसिकता आपल्याकडे अनेक वर्षांपासून आहे. ही मानसिकता जोपर्यंत दूर होत नाही, तोवर आतंकवाद संपवण्यामध्ये आपल्याला यश येणार नाही. आतंकवादी हा आईच्या पोटातून जन्म घेतल्यापासून बंदूक चालवायला शिकत नाही की राष्ट्रविद्रोही म्हणून जन्म घेत नाही. दहशतवादी हे तयार केले जातात, घडवले जातात, प्रशिक्षण देऊन विकसित केले जातात. असे काम करणारे हे अधिक घातक असतात. दुर्दैवाने, पुण्यातील कोंढव्यासारख्या विशिष्ट भागांमध्ये अशा मानसिकतेचे लोक आढळत आहेत, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. या भागात आपल्याला अधिक लक्ष द्यावे लागणार आहे.

आणखी एक गोष्ट म्हणजे, भारतविरोधी कारवाया करण्यासाठी भलेही पाकिस्तानसारखी राष्ट्रे अर्थसाहाय्य करत असली तरी पाकिस्तानची करन्सी आपल्याकडे चालत नाही. त्यासाठी भारतीय रुपयाचाच वापर केला जातो. हा पैसा यांना कोण देतो? हे फायनान्सर हवालाचे काम करणारे, काळ्या पैशांची कमाई करणारेच असतात. अशा लोकांची संख्या महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, अहमदनगर यांसारख्या भागात मोठी असल्याचे दिसून येत आहे. एनआयएला याबाबत मिळालेल्या माहितीनुसार ही सर्व छापेमारी सुरू आहे. त्यांना मिळालेली माहिती जवळपास ८० टक्के खरी असते. त्यामुळे त्यांना या विघातक व्यक्तींची धरपकड करण्यास मदत होते आणि त्यांच्या तपासातून धक्कादायक बाबी उघड होत जातात. मुळाशी जाऊन विचार केल्यास, अशा प्रकारची राष्ट्रविरोधी तत्त्वे किंवा मानसिकता भारतात हजारो वर्षांपासून आहे. देशावर जितक्या मुघलांनी स्वा-या केल्या, आक्रमणे केली, राज्य गाजवले त्यांना इथल्या उणिवांची, रणनीतीची माहिती देणारे आपलेच लोक होते ना? ब्रिटिशांनाही अशाच राष्ट्रद्रोही तत्त्वांनी मदत केली. ‘तोडा, फोडा आणि राज्य करा’ ही ब्रिटिशांची जी रणनीती होती त्याला या लोकांमुळेच यश मिळाले. छत्रपती शिवाजी महाराजांसह अनेक राजांना अशा फितुरांमुळे, गद्दारांमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागल्याच्या नोंदी इतिहासाच्या पानांवर आपल्याला आढळतात. या सर्वांचा अर्थ एकच आहे, तो म्हणजे राष्ट्रद्रोही मानसिकता जोपर्यंत संपुष्टात येत नाही तोपर्यंत अशा प्रकारचे देशद्रोही तयार होतच राहणार.

अमेरिकेने २००१ पासून आतापर्यंत १३ लाखांहून अधिक लोक दहशतवादाविरुद्धच्या लढाईत मारले; पण दहशतवाद संपला नाही. पाकिस्तानमध्ये जर्ब-ए-अज्ब या मोहिमेअंतर्गत उत्तर वझिरीस्तानातील फताह या भागात दहशतवादविरोधी मोहीम सुरू करण्यात आली. पण तरीही दहशतवाद कमी झाला नाही. उलट वाढतच गेला. त्या दहशतवाद्यांनी या अधिका-यांच्या मुलांना शाळेत जाऊन मारले. त्यामुळे माणसे मारण्याने दहशतवाद संपणार नाही. दहशतवाद संपवण्यासाठी वृत्ती, मानसिकता मारावी लागेल. त्या वृत्तीला खतपाणी घालणा-यांचा बंदोबस्त करावा लागेल. दहशतवादाचे आश्रयदाते, आर्थिक दाते संपवावे लागतील. दहशतवाद, नक्षलवाद, उग्रवाद यांच्याविरोधातील युद्ध लोकसहभागातूनच जिंकता येईल. या प्रश्नाचा सखोल विचार होणे आवश्यक आहे. यासाठी शालेय शिक्षणाच्या पातळीपासून आपल्याला दक्ष राहावे लागेल. सुशिक्षित तरुणांना चुकीच्या मार्गावर जाण्यापासून रोखण्यासाठी आपल्याला वेगळ्या प्रकारच्या उपाययोजना कराव्या लागतील. त्यांचे प्रबोधन करावे लागेल. चुकीच्या मार्गावर गेल्यावर परतीचे मार्ग बंद होतात याची जाणीव त्यांना करून द्यावी लागेल. त्यांच्या आई-वडिलांनाही हा संदेश दिला गेला पाहिजे.

याखेरीज सर्वसामान्य नागरिकांची सजगताही तितकीच महत्त्वाची आहे. आपल्या जवळपास घडणा-या घटनांबाबत ‘आपल्याला काय करायचंय’ अशा प्रकारची मानसिकता भारतात सर्रास दिसून येते. परंतु आपण हा विचार केला पाहिजे की शेजारच्या घरात लागलेली आग आपल्या घरापर्यंतही पोहोचू शकते. त्यामुळे समाजाने ही मानसिकता बदलावी लागेल. आपल्या सोसायट्यांमध्ये राहणारे लोक कोण आहेत, कुठून आले आहेत याकडे एक सजग नागरिक म्हणून आपले लक्ष असलेच पाहिजे. एखाद्या फ्लॅटमध्ये, घरामध्ये काही अनोळखी, संशयास्पद दिसणा-या व्यक्ती येत असतील तर त्याबाबत आपल्याला शंका आली पाहिजे आणि ती माहिती पोलिसांना दिली पाहिजे. जोपर्यंत लोक शासकीय सुरक्षा पद्धतीला मदत करणार नाहीत तोपर्यंत सुरक्षाव्यवस्था मजबूत होणार नाही. काश्मीर, पंजाब, ईशान्य भारतामध्ये काम करताना आम्ही आतंकवाद्यांना पकडण्याासाठी तेथील स्थानिकांचीच मदत घेत होतो.

-लेफ्टनंट जनरल
डॉ. दत्तात्रय शेकटकर (निवृत्त)

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR