नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी होणार आहे. राष्ट्रवादी हे नाव आणि घड्याळ चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला दिल्याच्या विरोधात माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधात याचिका दाखल केली. याच याचिकेवर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे नागालँडमधील आमदार अपात्रता प्रकरणाचीही उद्याच सुनावणी होणार आहे. जस्टीस सूर्यकांत आणि जस्टीस उज्ज्वल भुयन यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे.
एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नाव आणि चिन्हाबाबतची सुनावणी उद्या होणार आहे तर दुसरीकडे शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबतची सुनावणी पुन्हा लांबणीवर ढकलण्यात आली आहे. शिवसेना नाव आणि पक्षाचे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्याच्या विरोधात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी आधी १४ ऑगस्टला सुनावणी होणार होती. पण आता ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १७ सप्टेंबरला होणार आहे.