उदगीर : आगामी खरीप हंगामापुर्वीच रासायनिक खताच्या भावात मोठी वाढ झाल्याने शेतक-यांना मोठा आर्थिक फटका बसणार असुन शेतमालाच्या उत्पादन खर्चात वाढ होणार आहे. शेती उत्पादनासाठी रासायनिक खत अनिवार्य असल्याने शेतक-यांच्या व्यवहारात रासायनिक खताच्या किंमती महत्वाची भुमिका बजावतात. त्यात गेल्या कांही वर्षात सततची वाढच होत असल्याने शेतक-यांचे अर्थशास्त्र बिघडत असल्याची स्थीती आहे.
तालुक्यासह जिल्ह्यात खरीपाची पेरणी जुन महिन्यात होत असली तरी मे महिन्यापासुनच खताची खरेदी होते. शिवाय उसासाठी बेसळ डोस देणे आवश्यक असल्याने खताची आतापासुनच मागणी होत असुन भावात मोठी वाढ झाल्याने शेतक-यांना मोठी आर्थिक झळ बसणार आहे. मिश्रखते, सुपर, पोटँश यांच्या भावात मोठी वाढ झाल्याने शेतक-यांना अधिकचा आर्थिक भार पडणार आहे. गेल्या वर्षभरात उसाच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. सोयाबीनसाठी एकरी एक बँग खताची आवश्यकता आहे. तर उस पिकासाठी किमान आठ ते दहा पोते खत लागत असुन त्यातच खताच्या भावात वाढ झाल्याने सर्वाधीक फटका उसउत्पादक शेतक-यांना बसणार आहे.