25.7 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeराष्ट्रीयरेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर केले प्रश्न उपस्थित

रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर केले प्रश्न उपस्थित

अमरावती : लोकसभा निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात आला असताना तेलंगाणाचे मुख्यमंत्री आणि तेलंगाणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात ४० जवानांना वीरमरण आले होते. त्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला करत या हल्ल्याचा बदला घेतला होता. मात्र पुलवामा येथील दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर झालेल्या एअर स्ट्राईकवर विरोधी पक्षांसह काही नेते सातत्याने शंका घेत असतात. रेवंत रेड्डी केंद्रातील मोदी सरकारवर टीका करताना म्हणाले की केंद्र सरकारने पुलवामा हल्ल्याबाबत आतापर्यंत काही खुलासा केलेला नाही. या हल्ल्यामध्ये कुणाचा हात होता.

हल्ल्यात वापरलेली स्फोटके कुठून आली होती. याचा तपास का झाला नाही, असा प्रश्न रेवंत रेड्डी यांनी उपस्थित केला आहे. ते पुढे म्हणाले की, सरकारच्या गुप्तचर यंत्रणा काय करत होत्या. हा हल्ला का रोखता आला नाही. सरकारने आतापर्यंत या प्रकरणाची चौकशी करून हल्ला रोखण्यात अपयशी ठरलेल्या लोकांना समोर का आणले नाही. या हल्ल्याला कोण जबाबदार होते, हा प्रश्न आजही कायम आहे असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी पुलवामा हल्ल्यानंतर झालेल्या एअर स्ट्राईकवरतीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, खरोखरच एअरस्ट्राईक झाली होती की नाही, देवास ठाऊक. दरम्यान, रेवंत रेड्डी यांच्या या विधानानंतर भाजपाने त्यांच्यावर टीका केली आहे.

तेलंगाणाचे मुख्यमंत्री एअर स्ट्राईक आणि पुलवामा हल्ल्याबाबत पाकिस्तानला क्लीन चिट देण्याचा का प्रयत्न करीत आहेत असा सवाल भाजपा नेते बंडी संजय कुमार यांनी विचारला आहे. ते म्हणाले की, ज्यांचे पाकिस्तानमधील वृत्तपत्रांमधून कौतुक होते. तेच आज राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारत आहेत. ही तीच काँग्रेस आहे जी गोकुळ गेट, मक्का मशीद, दिलखुशनगर, लुंबिनी पार्क येथील बॉम्बस्फोटांना जबाबदार आहे. काँग्रेस राष्ट्रीय सुरक्षेवर बोलणारी शेवटची पार्टी असली पाहिजे. काही दिवसांनी काँग्रेसवाले हे बॉम्बस्फोट झालेच नाही, असे म्हणतील. राजकीय लाभासाठी तामिळनाडूचे मुख्यमंत्री भारतीय सैन्याच्या बलिदानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतील असे वाटले नव्हते असा टोला बंडी संजय कुमार यांनी लगावला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR