18.8 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeमहाराष्ट्रलग्नाचे मुहूर्त टाळा, वेळ बदला

लग्नाचे मुहूर्त टाळा, वेळ बदला

बीड : सगेसोयरे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील २४ फेब्रुवारीपासून मोठे आंदोलन सुरू करणार आहेत. आता हे आंदोलन गावागावांत असणार आहे. प्रत्येक गावात रास्ता रोको आंदोलन होणार आहे. त्यानंतर २९ फेब्रुवारीपासून मराठा समाजातील वृद्ध उपोषणास बसणार आहेत. तसेच ३ मार्च रोजी राज्यातील सर्वांत मोठे रास्ता रोको आंदोलन होणार आहे. यामुळे या दिवशी सकाळी लग्न लावू नका, सकाळी असणारे लग्न संध्याकाळी करा, असा सल्ला मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

३ मार्च रोजी लग्नाचा मुहूर्त असल्याने लग्नं मोठ्या प्रमाणावर आहेत. या दिवशी दुपारी आणि संध्याकाळी लग्नाचे मुहूर्त आहेत. या दिवशी दुपारी असणारी लग्नं संध्याकाळी लावावी. कारण या दिवशी सर्वांत मोठे रास्ता रोको आंदोलन निश्चित झाले आहे. त्यामुळे लग्न करणा-यांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. यामुळे या दिवशी मराठा समाजासह इतर समाजातील लोकांनीही दुपारची लग्नं संध्याकाळी करावी. लग्नास सर्व समाजातील लोक येत असतात. या दिवशी सर्व जण रास्ता रोको आंदोलनात सहभागी होतील. या रास्ता रोको आंदोलनात नवरदेव-नवरी सहभागी होतील, असे मनोज जरांगे यांनी सांगितले.

आंदोलनाची तयारी सुरू करा
आजपासून ३ मार्चच्या रास्ता रोको आंदोलनाची तयारी सुरू करा. या दिवशीचे रास्ता रोको आंदोलन असे करा की, संपूर्ण देशात असे आंदोलन झाले नसेल. या दिवशी एकाच वेळी, एकाच ठिकाणी
राज्यभरात रास्ता रोको आंदोलन करायचे आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
असा आहे नवीन प्लॅन
दोन दिवस सगेसोयरे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी वाट पाहिली जाणार आहे. त्यानंतर २४ फेब्रुवारीपासून २९ पर्यंत रास्ता रोको होणार आहे. तसेच २९ फेब्रुवारीपासून मराठा समाजातील वृद्धांनी उपोषणाला बसायचे आहे. आंदोलनादरम्यान वृद्धांचा मृत्यू झाला तर सरकार जबाबदार राहणार आहे. आपल्या राज्यात २५ ते ३० लाख म्हातारे असतील. माझ्या आई-बाबासह सर्व म्हातारे उपोषण करतील, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR