24.9 C
Latur
Wednesday, November 27, 2024
Homeमहाराष्ट्रलाडकी बहीण योजनेचे सर्व्हर डाऊन; मुदतवाढ देण्याची मागणी

लाडकी बहीण योजनेचे सर्व्हर डाऊन; मुदतवाढ देण्याची मागणी

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभासाठी वंचित महिलांसाठी मुदतवाढ दिली मात्र या योजनेचे सर्व्हर सकाळपासून चालू नसल्यामुळे तालुक्यातील बहुसंख्य महिला या योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहिल्या यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी महिला वर्गातून होत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै महिन्यापासून कार्यान्वित केली. यासाठी मोबाईल अ‍ॅप व संगणकाद्वारे ऑनलाईन नोंदणीचा पर्याय देण्यात आला त्यासाठी या योजनेत पात्र असलेल्या महिलांसाठी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर या पाच महिन्यांचे प्रत्येकी साडेसात हजार रुपये महिलांच्या खात्यावर जमा झाले. सप्टेंबर महिन्यामध्ये या योजनेची ऑनलाईन नोंदणी बंद करण्यात आली व नोंदणीचे अधिकार अंगणवाडी सेविकांना देण्यात आले.

या योजनेचे अनुदान हे आधारप्रमाणे सोडण्यात आल्यामुळे बहुसंख्य महिलांचे खाते आधार लिंक असतानासुद्धा अन्यत्र उघडण्याची सूचना दिल्यामुळे बहुसंख्य महिलांना पुन्हा या संदर्भात पोस्टात खाते उघडावे लागले.

ज्या राष्ट्रीयीकृत बँकेत हे पैसे जमा झाले त्यामध्ये निम्म्याहून अधिक महिलांची खाती निष्क्रिय असल्यामुळे त्यांना पुन्हा त्या खात्याची केवायसी करावी लागली त्यामुळे बँकेत महिलांचीच गर्दी दिसून आली. ऐन दसरा सणात हे पैसे महिलांच्या खात्यावर आल्यामुळे महिलांना ते उपयोगी पडले तर या योजनेच्या लाभापासून अनेक महिला वंचित राहिल्यामुळे महिलांनी त्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी केल्यानंतर चार दिवसांपूर्वी या योजनेसाठी १५ ऑक्टोबरची मुदत शासनाने जाहीर केली यासाठी वंचित महिलांनी ग्रामीण भागात असलेल्या अंगणवाडी सेविकेकडे आपापले अर्ज जमा केले.

मात्र या अर्जाची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठीचे सर्व्हर सकाळपासून बंद असल्यामुळे अनेक महिला या नव्या योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहिल्या. तर सर्व्हर डाऊनसाठी अंगणवाडी सेविकांना देखील मन:स्ताप सहन करावा लागला. आलेल्या अर्जांचे काय करायचे असा प्रश्न समोर उभा राहिला त्यामुळे वंचित महिलांना शासन मुदतवाढ देणार का असा प्रश्न सध्या विचारला जात आहे.

या योजनेसाठी महिन्यापूर्वी नोंदणी करून देखील अद्याप ज्या महिलांच्या खात्यावर अनुदान जमा नाही त्या महिलांचे अनुदान तातडीने जमा करावे. वंचित महिलांना लाभ मिळावा म्हणून मुदतवाढ द्यावी अन्यथा त्या महिलांना सावत्र बहिणीची वागणूक देऊ नये.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR