25.5 C
Latur
Saturday, October 19, 2024
Homeमहाराष्ट्र‘लाडक्या बहिणीं’ना दिवाळी बोनस; निव्वळ अफवाच

‘लाडक्या बहिणीं’ना दिवाळी बोनस; निव्वळ अफवाच

राज्य सरकारने दिले स्पष्टीकरण

मुंबई : महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अमलात आणली. या योजनेसाठी ४६ हजार कोटींची तरतूद करण्यात आली असून या अंतर्गत आतापर्यंत २ कोटी २६ लाखांहून अधिक राज्यांतील बहिणींच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे. दरम्यान, काही महिलांना या योजनेतून दिवाळी बोनस मिळणार असल्याच्या बातम्या पसरल्या होत्या. मात्र काही निवडक महिलांनाच दिवाळी बोनस मिळणार असे यामधून सांगण्यात येत होते. मात्र याबाबत शासनाने कोणतीही अधिकृत माहिती दिली नव्हती.

या योजनेअंतर्गत ज्या महिलांच्या घरचे उत्पन्न अडीच लाखांपर्यंत आहे अशा २१ ते ६५ वर्षे वयोगटातील महिलांना महाराष्ट्र सरकारकडून पैसे दिले जात होते. अशा महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारने जुलै महिन्यापासून राबवण्यास सुरुवात केली. याअंतर्गत महिलांच्या खात्यात पाच हप्त्यांचे पैसेही जमा करण्यात आले आहेत. महिलांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे दिल्यानंतर शासनाने ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे एकत्र खात्यात जमा केले.

आता थेट डिसेंबर महिन्यात पैसे खात्यात येतील. मात्र अद्याप पैसे कधी खात्यात जमा होतील याची तारीख स्पष्ट करण्यात आलेली नाही. दरम्यान, सरकारकडून दिवाळी बोनस म्हणून अजून अडीच हजार रुपये मिळणार असल्याची माहिती पसरली होती. त्यामुळे अनेक महिला या अडीच हजार रुपयांची वाट पाहत आहेत. मात्र, हे पैसे कधी मिळणार याबाबत काहीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे महिलावर्गामध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

मोबाईल गिफ्ट मिळण्याच्या अफवा
दरम्यान, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या कार्यालयाने ही माहिती खोटी असल्याचे स्पष्ट केले आहे. सरकारने लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींना दिवाळी बोनस देण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. याआधी मोबाईल गिफ्ट मिळण्याच्या अफवाही पसरल्या होत्या, परंतु त्याबाबतही कोणताही शासन निर्णय झालेला नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR