22.3 C
Latur
Tuesday, January 21, 2025
Homeलातूरलातूरमधून माजी मंत्री आमदार अमित देशमुख तर लातूर ग्रामीणमधून आमदार धिरज देशमुख यांना उमेदवारी...

लातूरमधून माजी मंत्री आमदार अमित देशमुख तर लातूर ग्रामीणमधून आमदार धिरज देशमुख यांना उमेदवारी द्या

लातूर : प्रतिनिधी
लातूर विधानसभा मतदारसंघातून माजी मंत्री अमित विलासराव देशमुख तर लातूर ग्रामीण मतदारसंघातून आमदार धीरज विलासराव देशमुख यांना काँग्रेस पक्षाने पुन्हा उमेदवारी द्यावी, अशी एकमुखी मागणी मंगळवारी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली. काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या सूचनेनुसार पक्षनिरीक्षक माजी आमदार रामहरी रुपनर यांच्या उपस्थितीत दि. ८ ऑक्टोंबर रोजी लातूर काँग्रेस भवन येथे जिल्ह्यातील विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या, यावेळी लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून माजी मंत्री आमदार अमित देशमुख एकमेव उमेदवारी मागणी अर्ज आला असून त्याच पद्धतीने लातूर ग्रामीण मतदार संघातून ही आमदार धीरज देशमुख यांचाही एकमेव उमेदवारी मागणी अर्ज आला आहे.
त्यांनी, पक्षशस्तीप्रमाणे निरीक्षकांकडे रीतसर आपली मागणी नोंदवली, यावेळी उपस्थित पदाधिकारी कार्यकर्त्यांनी त्यांच्या उमेदवारीची एकमुखी मागणी केली, माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील सर्व विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी करण्याचा निर्धार ही यावेळी करण्यात आला. यावेळी लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे लातूर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा शीलाताई पाटील, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस उपाध्यक्षा विद्याताई पाटील, सुभाष घोडके, एकनाथ पाटील, प्राध्यापक प्रवीण कांबळे, अनुप शेळके, प्रमोद जाधव, चंद्रकांत धायगुडे आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना निरीक्षक माजी आमदार रामहरी रुपनवर म्हणाले की, लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून एकच इच्छुक उमेदवारी अर्ज आला आहे, तर लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून एकच उमेदवारी अर्ज आला आहे, अहमदपूर ६,  उदगीर ५, औसा ५,  निलंगा १२ असे उमेदवारी अर्ज आले आहेत. राजकारणातील निवडणुका हा कार्यकर्त्यांचा उत्सव असतो. एक मोठा उत्सव लोकसभेचा साजरा केल्यानंतर आता विधानसभेला आपणाला विजय प्राप्त करायचा आहे. लातूर जिल्ह्यातील विधानसभेच्या सहाही जागा काँग्रेसला द्या, असा आमचा महाविकास मागणी असल्याचे  त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आमदार धीरज विलासराव देशमुख यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी केली आहे. या मतदारसंघात फक्त आमदार देशमुख यांचा एकच उमेदवारी मागणी अर्ज  आलेला आहे. त्याप्रमाणेच लातूर शहर विधानसभेतूनही आमदार अमित विलासराव देशमुख यांना उमेदवारी द्यावी अशी काँग्रेस शिष्टमंडळाने मागणी केलीआहे, या मतदारसंघात हा एकमेव उमेदवारी मागणी अर्ज दाखल झाला आहे. सर्वसहमतीने एकाच नेतृत्वासाठी उमेदवारी अर्ज मागण्यासाठीचे हे दुर्मिळ उदाहरण असल्याचेही त्यांनी म्हटले  आहे.  लातूर जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते समजदार आहेत. विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीत महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांपेक्षा लातूर जिल्हा आघाडीवर आहे मुलाखती दिलेल्या सर्व उमेदवारांनी सांगितले आहे की, काँग्रेस पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्याच्यासोबत आम्ही  खंबीरपणे उभे राहू असे त्यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR