23.9 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeलातूरलातूरवर होर्डिंगचा धोका घोंगावतोय

लातूरवर होर्डिंगचा धोका घोंगावतोय

लातूर : एजाज शेख
घाटकोपरमध्ये एक मोठे होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत १४ लोक ठार तर ८० लोक जखमी झाले. यंत्रणेच्या केवळ दुर्लक्षामुळे एवढी मोठी घटना घडली. लातूर शहरातही या पेक्षा वेगळी परिस्थिती नाही. ३६१ खाजगी जाहिरात एजन्सींनी शहरातील इमारतींचा ताबा घेतला असून उंच उंच इमारतींवर मोठ्या आकारांचे होर्डिंग लावण्यात आलेले आहेत. सध्या वादळी वा-यासह बेमोसमी पाऊस पडत आहे. बहुतांश ठिकाणच्या होर्डिंगचे पडदे फाटून वा-याने होर्डिंगचे लोखंडी सांगाडे हलत आहेत. अशा होर्डिंगचे फाऊंडेशन कधी कमकुवत होऊन होर्डिंगचे लोखंडी सांगाडे खाली कोसळतील हे सांगता येत नाही. त्यामुळे लातूर शहरावर होर्डिंगचा धोका घोंगावतो आहे.
सध्याच्या युगात जाहिरातबाजीवर सर्वाधिक खर्च केला जात आहे. कोणत्याही वस्तू, खाजगी शिकवणी क्लासेस, वाढदिवस, पुण्यतिथी, विविध सार्वजनिक कार्यक्रम असो की, आस्थापनाची जाहिरात केली जाते. त्यासाठी होर्डिंगचा वापर केला जातो. लातूर लोकसभा निवडणुकीसाठी नूकतेच मतदानही झाले. निवडणुकीच्या प्रचारासाठीही मोठ्या प्रमाणात होर्डिंग वापर झाला. लातूर शहरात ३६१ जाहिरात खाजगी एजन्सींनी शहरातील मोठ-मोठ्या इमारातींचे टेरेस बुक केलेले आहेत. इमारतींच्या टेरेसवर लोखंडी सांगाडा उभा करुन त्यावर जाहिरातीचा मजकुर असलेले बॅनर चिकटवले जाते. एकदा बॅनर चिकटवल की, त्याकडे कोणी पाहात नाही.
 सध्या वादळी वारा सुटलेला आहे. उन, वारा आणि पावसाने बॅनर जिर्ण होऊन फाटते. फाटलेले बॅनर वादळी वा-याने हेलकावे खात आहेत. त्यामुळे होर्डिंगचे लोखंडी सांगाडेही हलत आहेत. या सांगाड्याचे फाऊंडेशन कमकुवत होऊन कधी हे सांगाडे इमारतींवरुन खाली कोसळतील हे सांगता येत नाही.  ३६१ खाजगी जाहिरात एजन्सींनी शहरातील उंच इमारतींवर १०*२०, २०*३० चे होर्र्डिंग उभे केलेले आहेत. तर शहरातील प्रमुख ठिकाणी १२*२४, १५*३० चे १२ ते १३ युनीपोल उभे करण्यात आलेले आहेत. शहरातील मुख्य रस्त्यावरील रस्ता दुभाजकांत ३*४ चे ३७५ छोटे होर्डिंग असतात. परंतू, या छोट्या होर्डिंगची मुदत संपली आहे. त्यासाठी नव्याने निविदा प्रक्रिया सध्या सुरु आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR