लातूर : प्रतिनिधी
लातूर सायकलिस्ट क्लबच्या १०१ सायकलस्वारांनी काल ७ जुलै रोजी पंढरपूर येथे भव्य सायकल वारी पूर्ण केली. १२ ते ६० वर्षे वयोगटातील या सायकलस्वारांमध्ये ६ महिलांचाही समावेश होता. या वीर सायकलस्वारांनी १४ तासांत २०० किलोमीटर अंतर पार करुन विठ्ठलाचे दर्शन घेतले.
पंढरपूरमध्ये दरवर्षी आयोजित होणा-या या सायकल वारीचे हे तिसरे वर्ष होते. अखिल महाराष्ट्र पंढरपूर सायकलवारी संमेलन २०२४ नावाने ओळखल्या जाणा-या या वारीमध्ये विठुरायाच्या पुण्यभूमीची नगरप्रदक्षणा, रिंगण सोहळा आणि वारी संमेलन आशय कार्यक्रमांचा समावेश होता. महाराष्ट्रातील ४२ सायकलिस्ट क्लब या वारीत सहभागी झाले होते. सदर सायकल वारीमध्ये लातूर सायकलिस्ट क्लबचे विष्णु मदणे यांनी सायकलवारी संमेलनासाठी मोठी देणगी दिल्याने वारी संमेलनात त्यांचा सन्मान करण्यात आला. यात सहभागी झालेल्या सर्व सायकलस्वारांचे आणि आयोजकांचे आम्ही अभिनंदन करतो. अशा प्रकारे लातूर सायकलिस्ट क्लबने पुन्हा एकदा आपल्या धाडस आणि समर्पणाची भावना सिद्ध केली आहे.