23.3 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeमहाराष्ट्रलालपरी होणार चकाचक!

लालपरी होणार चकाचक!

एसटी बस, स्थानकाच्या स्वच्छतेबाबत एसटी महामंडळाचा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी
स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त (२३ जानेवारी) पुढील वर्षभर एसटीच्या राज्यभरातील सर्व बसस्थानकांवर शिवसेना पक्षनेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान’ राबवण्यात येणार आहे. तब्बल ३ कोटी रुपयांची बक्षिसे या अभियानांतर्गत वाटण्यात येणार असून राज्यात ‘अ’ वर्गात पहिले येणा-या बसस्थानकाला १ कोटीचे बक्षीस जाहीर करण्यात येत आहे, अशी घोषणा राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे.

दरम्यान, एसटी बस आणि एसटी बस स्थानकात स्वच्छता राखली जावी यासाठी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बस स्थानक अभियान’ ५ महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आले आहे, परंतु एसटीच्या अस्वच्छ बसेस रस्त्यावर दिसत आहेत त्यामुळे पुन्हा एकदा या अभियानास गती देण्याचे प्रशासनाने ठरविले आहे.

या अभियानाचा शुभारंभ उद्या (२३ जानेवारी) मंत्री सरनाईक यांच्या हस्ते कुर्ला नेहरूनगर बस स्थानकावर होणार आहे. यानिमित्ताने सर्व राज्यभर प्रत्येक बसस्थानकावर शालेय विद्यार्थी, सामाजिक संस्था व एसटी कर्मचा-यांच्या सहकार्यातून सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.

मागील वर्षी हे अभियान सुरू करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अभियानाची संकल्पना विशद करताना, सर्वसामान्य प्रवाशांना स्वच्छ व सुंदर बसस्थानक तसेच निर्जंतुक, टापटीप प्रसाधनगृहे कायमस्वरूपी उपलब्ध करून देणे हे एस. टी. महामंडळाचे प्रथम कर्तव्य आहे. या जाणिवेतून हे अभियान सुरू करण्यात येत आहे. असे स्पष्ट केले होते.

तसेच ‘आपलं गाव, आपलं बसस्थानक’ या संकल्पनेवर आधारित लोकसहभागातून बसस्थानकांचा सर्वांगीण विकास करणे हा या अभियानाचा मुख्य ‘गाभा’ असल्याचे सांगितले होते. ख-या अर्थाने बसस्थानक हे त्या गावची ‘शान’ असल्यामुळे गावातील तरुण मंडळे, महिला बचत गट, विविध सामाजिक संस्था, उद्योग समूह यांनी पुढे येऊन त्या बसस्थानकाच्या सुशोभीकरण आणि सौंदर्यीकरणासाठी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन यावेळी मंत्री सरनाईक यांनी केले आहे.

वर्षभर चालणा-या या अभियानामध्ये दर ३ महिन्यांनी प्रत्येक बसस्थानकाचे मूल्यमापन होणार आहे. त्यासाठी एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिका-यांच्या नेतृत्वाखाली परीक्षण समित्या नेमण्यात आल्या असून त्यांनी दिलेल्या गुणांच्या आधारे सरासरीद्वारे बस स्थानकाचे क्रमांक निश्चित करण्यात येतील. राज्यभरात एसटीच्या असलेल्या सर्व बस स्थानकांचे तेथील प्रवासी चढ-उतार संख्येच्या आधारे शहरी अ ‘ वर्ग, निमशहरी ‘ब’ वर्ग व ग्रामीण ‘क’ वर्ग अशा तीन गटांमध्ये विभागणी केलेली आहे. प्रथम प्रादेशिक स्तरावर प्रत्येक गटनिहाय पहिला, दुसरा आणि तिस-या क्रमांकासाठी स्पर्धा रंगणार असून अंतिम स्पर्धा राज्यस्तरावर घेण्यात येईल. त्यासाठी प्रत्येक प्रादेशिक स्तरावर गटनिहाय पहिला आलेल्या बसस्थानकाचा विचार केला जाणार आहे.

‘अ’ वर्ग गटातून पहिला येणा-या बसस्थानकाला १ कोटी रुपये
राज्यपातळीवर ‘अ’वर्ग गटातून पहिल्या येणा-या बसस्थानकाला १ कोटी रुपये ‘ब’वर्ग गटातून पहिल्या येणा-या बसस्थानकाला ५० लाख रुपये तर ‘क’ वर्ग गटातून पहिल्या येणा-या बसस्थानकाला २५ लाख रुपये इतक्या रकमेची बक्षिसे देण्यात येणार आहेत. या अभियानाचा शुभारंभ सन्माननीय परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते २३ तारखेला सकाळी ११ वाजता कुर्ला नेहरूनगर बसस्थानकावर होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR