23.9 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeसंपादकीयवयम् मोठम् खोटम्!

वयम् मोठम् खोटम्!

सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामिनावर सुटका केल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. पुढील वर्षी पंतप्रधान मोदी निवृत्त होत असल्याने भाजपने लोकसभा निवडणूक जिंकल्यास पुढचा पंतप्रधान कोण असेल असा सवाल केजरीवाल यांनी केला. पंतप्रधान मोदी ‘एक देश, एक नेता’ अशी मोहीम राबवत असून ४ जून रोजी भाजपची सत्ता आल्यास विरोधी पक्षातील अनेक नेते तुरुंगात असतील तसेच भाजपमधील मोठे नेते राजकीय मंचावर दिसणार नाहीत. पुढील दोन महिन्यांत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बाजूला केले जाईल. सप्टेंबर २०२५ नंतर अमित शहा देशाचे पंतप्रधान होतील असा खळबळजनक दावा केजरीवाल यांनी केला.

केजरीवाल म्हणाले, भाजप इंडिया आघाडीला विचारते की, तुमचा पंतप्रधान कोण होणार? मला भाजपला विचारायचे आहे की, तुमचा पंतप्रधान कोण होणार? १७ डिसेंबर रोजी पंतप्रधान मोदी ७५ वर्षांचे होतील. मोदी यांनी स्वत: २०१४ रोजी नियम लागू केला होता की, जो नेता ७५ वर्षांचा होईल तो निवृत्त होईल. त्यामुळे वयाची पंचाहत्तरी ओलांडल्यानंतर मोदी निवृत्त होणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ते वयाच्या पंचाहत्तरीनंतर निवृत्त होणार नसतील तर ‘वयम् मोठम् खोटम्’ हेच सिद्ध होईल. केजरीवाल म्हणाले, मोदी निवृत्त होणार नसतील तर हा नियम फक्त अडवाणींसाठीच होता हे स्पष्ट करावे. मोदींनी वसुंधरा राजे, शिवराज सिंह चौहान, डॉ. रमण सिंह यासारख्या नेत्यांचे राजकारण संपुष्टात आणले. आता पुढील नंबर योगी आदित्यनाथ यांचा आहे! भाजप प्रामुख्याने मोदींचा चेहरा समोर ठेवून मते मागत असताना केजरीवालांच्या विधानामुळे दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, हिमाचल प्रदेश या उत्तरेतील महत्त्वाच्या राज्यांच्या मतदारांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. यावर स्पष्टीकरण देताना भाजप नेत्यांची पुरती दमछाक होताना दिसते आहे. केजरीवालांच्या दाव्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना तातडीने खंडन करावे लागले. ‘पंचाहत्तरी’ पार केल्यानंतरही मोदीच पंतप्रधानपदी कायम राहतील असे त्यांनी जाहीर केले. मोदींच्या पंचाहत्तरीचा मुद्दा ऐरणीवर आणून केजरीवालांनी भाजपमधील पक्षांतर्गत स्पर्धेला खतपाणी घातल्याचे मानले जात आहे.

निकालाची आतुरतेने वाट पाहणा-या राजनाथसिंह, नितीन गडकरी, योगी आदित्यनाथ अशा अनेक कथित मोदीविरोधकांच्या महत्त्वाकांक्षेला केजरीवालांनी चुचकारल्याचे बोलले जात असून मोदी विरुद्ध शहा आणि शहा विरुद्ध अन्य नेते असा संघर्ष होण्याची शक्यताही त्यांनी अप्रत्यक्षपणे बोलून दाखविली आहे. ‘एक देश, एक नेता’ ही धोकादायक मोहीम असून त्याद्वारे देशातील सर्व नेत्यांना संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. विरोधकांना तुरुंगात टाकले जाईल तर भाजप नेत्यांचे राजकारण संपवले जाईल. मुरली मनोहर जोशी, लालकृष्ण अडवाणी यांना निवृत्त करण्यात आले तर रमण सिंह, शिवराज सिंह चौहान, वसुंधरा राजे, मनोहरलाल खट्टर यांचे राजकारण मोदींनी संपवले आहे. मात्र, अमित शहा म्हणतात, भाजपच्या घटनेत ७५ व्या वर्षी निवृत्त करण्याचा नियम नाही. भविष्यात देशाचे नेतृत्व पंतप्रधान मोदीच करतील. निवडणूक जिंकून मोदी तिस-यांदा पंतप्रधान होतील, असे स्पष्ट करत अमित शहा यांनी केजरीवाल यांचा दावा फेटाळून लावला. असे असले तरी याबाबत देशभर तीव्र संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राजकारण्यांच्या निवृत्तीबाबत खुद्द राजकारणातही वेगवेगळे मतप्रवाह आहेत. गत लोकसभा निवडणुकीच्या वेळी राहुल गांधी यांनी राजकारणात निवृत्ती असावी आणि ६० वर्षे हे राजकीय नेत्यांच्या निवृत्तीचे वय असावे असे म्हटले होते. भारतातील बहुतांश राजकारण्यांसाठी वय हा केवळ एक आकडा आहे.

परिस्थिती अतिशय प्रतिकूल झाल्याशिवाय ते राजकारण सोडत नाहीत. याच अनुषंगाने अजित पवार यांनी शरद पवार हे ८३ वर्षांचे आहेत, अशी खोचक टिप्पणी केली होती. अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांचे उदाहरण देताना हेच सुचवण्यात आले होते. याचाच अर्थ राजकारण्यांनाही याबाबत टोचणी लागलेली आहे. सरकारने नोकरशहांच्या निवृत्तीचे वय निश्चित केले आहे मग राजकारण्यांसाठी सेवानिवृत्तीचे वय का नाही, असा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जातो. त्यामुळे आता नवभारताच्या निर्माणासाठी योग्य निर्णय घेण्याची वेळ आली आहे. तरुणांना जास्तीत जास्त संधी देऊन वरिष्ठांनी त्यांच्यासाठी जागा रिकाम्या केल्या पाहिजेत आणि सल्लागार व मार्गदर्शकाची भूमिका पार पाडली पाहिजे. प्रत्येक व्यवसाय आणि नोकरीत निवृत्तीचे वय निश्चित असले तरी राजकारण हे एकमेव असे क्षेत्र आहे की जिथे निवृत्तीच्या वयाला कोणतीही सीमा नाही. किंबहुना वाढते वय हीच तिथे मोठी पात्रता आहे! २०११ मधील जनगणनेच्या आकडेवारीनुसार जगात भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. राजकारणीसुद्धा आपल्या भाषणात हे आवर्जून सांगतात.

सरकार सध्या धोरण आखताना युवा भारत डोळ्यासमोर ठेवून आपला प्राधान्यक्रम निश्चित करते. तरुण हे नेहमीच कोणत्याही प्रश्नाकडे पाहताना नव्या दृष्टीने विचार करतात. प्रश्न सोडवताना नवनवीन कल्पनांना प्राथमिकता देतात. राजकारणी माणसांचे अनुभव आणि ज्ञान पुढच्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरू शकते. राजकारणी व्यक्ती जनतेसाठी कायदे बनवितात ते त्यांनासुद्धा लागू होतात. देशातील महत्त्वाच्या पदांवर वयोवृद्ध राजकारणी ठाण मांडून बसले आहेत, खुर्चीला चिकटून राहण्याच्या त्यांच्या मनोवृत्तीबाबत युवावर्गात खदखद आहे. वास्तव काय आहे हे जाणून न घेणारे वृद्ध नेतेच देशाच्या प्रगतीतील प्रमुख अडथळे आहेत, अशी युवावर्गाची भावना बनली आहे, ती दूर करावी लागेल. तरुण पिढी आणि ज्येष्ठांमध्ये उत्तम समन्वय निर्माण झाला पाहिजे. तरुणांनी ज्येष्ठांचा आदर केला पाहिजे, तरच राजकारण सशक्त होईल. दोन पिढ्यांनी हातात हात घालून काम केले पाहिजे अर्थात त्यासाठी जुन्या पिढीने खुर्चीचा मोह सोडायला हवा. नाहीतर युवा पिढी म्हणेल… वयम् मोठम् खोटम्!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR