लातूर : प्रतिनिधी
मांजरेश्वर हनुमान मंदिर हे जागृत देवस्थान आहे, या परिसराचा विकास केल्याने या परिसरात वारकरी नित्यनेमाने येतात. वारकरी सांप्रदायाच्या अनेक मागण्या सरकार दरबारी प्रलंबित आहेत. आता लोकशाहीची वारी सुरु होणार आहे. लोकशाहीचे मंदिर म्हणजे महाराष्ट्र विधानसभा होय वारक-यांच्या मागण्या आमच्याकडे द्या काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यात या मागण्यांचा समावेश करुन महाविकास आघाडीचे सरकार राज्यात पुन्हा यावे यासाठी सर्वांनी आशीर्वाद द्यावा आमच सरकार सत्तेवर आल्यावर वारक-यांच्या न्याय मिळण्यासाठी जो विलंब लागतो आहे तो दूर केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
लातूर शहरानजीकच्या शामनगर परिसरातील मांजरेश्वर हनुमान मंदिर सभागृहात ह.भ. प. लालासाहेब देशमुख महाराज यांच्या पासष्टीनिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यास राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दि. २ ऑगस्ट रोजी दुपारी शामनगर १२ नंबर पाटी येथे उपस्थित राहून, २१ वर्षे आळंदी ते पंढरपूर पायी वारी पूर्ण झाल्याबद्दल त्यांचा सपत्नीक सत्कार केला. तसेच याप्रसंगी वारकरी संप्रदायातील विविध पुरस्काराचे वितरण केले. मांजरेश्वर हनुमान मंदिर हे जागृत देवस्थान आहे,
या परिसराचा विकास लवकरच करण्याची ग्वाही याप्रसंगी त्यांनी दिली. यावेळी अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष हभप प्रकाश बोधले महाराज, हभप अण्णासाहेब बोधले महाराज, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, विलास को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्हाईस चेअरमन समद पटेल, ट्वेंटीवन शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन रवींद्र काळे, मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन गणपत बाजुळगे, व्हाईस चेअरमन सचिन पाटील, विकास लालासाहेब देशमुख, प्रा. प्रकाश लालासाहेब देशमुख, गुरुनाथ गवळी, अनंत बारबोले, परमेश्वर वाघमारे रवी वाकुरे आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी देशमुख कुटुंबीय मित्रपरिवार वारकरी बंधू भगिनी उपस्थित होते.
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, संतपीठ निर्माण करण्यासाठी वारकरी संप्रदाय प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाचे प्राबल्य आहे. महाराष्ट्रात दिंडी जसे आपल्याकडे निघतात तशा कुठेही निघत नाहीत, मराठवाडा ही संतांची भूमी आहे. लातूर जिल्ह्यातही वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात आहे. प्रत्येक गावात हरी नामाचा जप होत असतो, वारकरी संप्रदायाला प्रत्येकाने जपले पाहिजे नोंदणीकृत भजनी मंडळाला आमदार व खासदार फंडातून साहित्य मिळायला पाहिजे, अशी आमची मागणी त्यांनी केली. सूत्रसंचालन प्राध्यापक श्रीहरी वेदपाठक यांनी केले, कार्यक्रमानंतर माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी मांजरेश्वर हनुमान मंदिरात व विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात जाऊन दर्शन घेतले.