19.7 C
Latur
Saturday, January 11, 2025
Homeमहाराष्ट्रवाल्मिक कराडचा आणखी एक प्रताप... अनुदानाच्या नावाखाली १४० शेतक-यांना ११ कोटी २० लाखांचा गंडा!

वाल्मिक कराडचा आणखी एक प्रताप… अनुदानाच्या नावाखाली १४० शेतक-यांना ११ कोटी २० लाखांचा गंडा!

बीड : प्रतिनिधी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात संशयित आरोपी वाल्मिक कराड याचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. वाल्मिक कराडने राज्यातील १४० शेतक-यांची फसवणूक केली आहे. कृषीमंत्री माझ्या जवळचे आहेत, तुम्हाला अनुदान मिळवून देतो, असे सांगत वाल्मीक कराड याने १४० शेतक-यांकडून पैसे घेतले. या सर्वांना ११ कोटी २० लाख रुपयांचा गंडा वाल्मिक कराड याने घातल्याचा आणि पैसे परत मागितल्यावर मारहाण करून हाकलून दिल्याचा आरोप शेतक-यांनी केला आहे. वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर आता त्याचा हा प्रताप समोर आला आहे.

सोलापूरसह राज्यातील १४० ऊस तोडणी यंत्र मालकांना ११ कोटी २० लाख रूपयांचा गंडा वाल्मिक कराड याने घातल्याचा आरोप पंढरपूर येथील शेतकरी दिलीप नागणे यांनी केला आहे. दिलीप नागणे हे हार्वेस्टिंग मशीनच्याद्वारे ऊस तोडणीचे काम करतात. या मशिनला प्रत्येकी ३६ लाखाचे अनुदान देतो, असे सांगून वाल्मिक कराड याने या मशीन मालकांना प्रत्येकी आठ लाख रुपये देण्याचे सांगितले होते. तत्कालीन कृषीमंत्री हे माझे जवळचे असून तुम्हाला अनुदान मिळवून देतो, तुम्ही फक्त रोख रक्कम घेऊन माझ्याकडे या, असे कराड यांनी सांगितल्याचे दिलीप नागणे यांनी सांगितले.

पोत्यात भरुन आणले पैसे…
वाल्मिक कराड याने सांगितल्यानंतर १४० मशीन मालकांनी प्रत्येकी आठ लाख रुपये गोळा करून ते एका पोत्यात भरले. हे पैसे मुंबई येथील विश्रामगृहात कराड यांना दिल्याचे दिलीप नागणे यांनी सांगितले. मात्र, नंतर कुठल्याच प्रकारचे अनुदान मिळाले नाही. त्यामुळे या मशीन मालकांनी वाल्मिक कराड यास फोन करून आम्हाला अनुदान मिळाले नाही, आमचे पैसे परत द्या, अशी मागणी केल्यावर त्यांना बीडला बोलवण्यात आले. यावेळी हे सर्व १४० मशीन मालक बीड येथे गेले असता तुमचे कोणते पैसे आहेत? असे विचारत कराड आणि त्यांच्या सहका-यांनी मारहाण केल्याचे दिलीप नागणे यांनी सांगितले. या प्रकरणामध्ये सोलापूर, कोल्हापूर, अहिल्या नगर, सांगली या भागातील ऊस तोडणी यंत्र मालकांची फसवणूक केल्याचे दिलीप नागणे यांनी सांगितले. वाल्मिक कराड यांच्या दहशतीमुळे आम्ही पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल केली नसल्याचेही नागणे यांनी सांगितले. आता वाल्मीक कराड याला अटक झाल्यानंतर हे १४० पैकी सोलापूर जिल्ह्यातील काही मशीन मालक तक्रार देण्यासाठी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत.

सुशील कराड विरूद्ध सोलापूर कोर्टात तक्रार
सुशील कराड याच्याविरोधात जिल्हा न्यायालयात तक्रार दाखल केल्यानंतर याप्रकरणी वकिलांनी सविस्तर माहिती दिली. सुशील वाल्मिक कराड आणि त्याचे दोन साथीदार अनिल मुंडे आणि गोपीन गुंजेवार या तिघांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यातील पीडित महिलेचा पती जो सुशील कराड याच्याकडे काम करत होता. सुशील कराड हा त्याला कायम म्हणायचा की तू इतके पैसे कसे कमावले, तुझ्याकडे इतक्या गाड्या कशा आल्या, अशी सतत विचारणा करत मारहाण करत होता. या प्रकरणी सुनावणी येत्या १३ जानेवारीला होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR