भूम : प्रतिनिधी
वाशी पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या रवींद्र लिंबाजी शिंदे याच्यासह त्याची मैत्रीण, काचचालक अशा तीघांवर छत्रपती संभाजीनगर येथील महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी शनिवारी दि. २२ जून रोजी भूम पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिका-यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याने धाराशिव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी सांगितले की, पिडीत महिला व सहाय्यक पोलीस निरिक्षक रवींद्र शिंदे याची मैत्रीण सुनिता गोविंद मस्के (रा.बीड) या दोघी बालपणीच्या मैत्रीणी आहेत. सुनिता मस्के हिचा नवरा त्रास देत असल्याची माहिती पिडीतेला सुनिता फोन वरून सांगत असे. एकेदिवशी म्हणजे दि. २० एप्रिल २०२४ रोजी सुनिता म्हस्के ही अचानक छत्रपती संभाजीनगर येथे पत्ता विचारत पिडीतेच्या घरी गेली. तीथे ती पंधरा दिवस राहीली. दरम्यान ती रात्री-अपरात्री फोनवर रवींद्र शिंदे याच्याशी बोलायची. तीने सांगितले की, रवींद्र शिंदे हा पोलीस अधिकारी असून तो माझा मित्र आहे. तो धाराशिव येथे नोकरीस आहे. दि. २ मे रोजी रवी शिंदे याने सुनिताला घेऊन येण्यासाठी संभाजीनगर येथे कार पाठवली. त्या कारमध्ये पिडीता व सुनिता दोघी सरमकुंडी (ता. वाशी) येथे आल्या. तेथून त्या भूम येथील शासकीय विश्रामगृह समोरील तुळजाई निवासस्थानी आल्या. रात्री जेवन केल्यानंतर पिडीता माघारी संभाजीनगरला निघाली.
३ मे रोजी सुनिताने पिडीतेला फोन करून रवी शिंदे त्रास देत असल्याने तु भूम येथे लवकर ये, असे सांगितले. माणुसकी म्हणून पिडीता दि. ४ जून २०२४ रोजी सायंकाळी एसटी बसने संभाजीनगर येथून सरमकुंडी येथे आल्या. तेथून एपीआय रवींद्र शिंदे व प्रदीप नावाच्या व्यक्ती सोबत कारने भूम येथील तुळजाई निवासस्थानी आल्या. त्यानंतर रात्री सुनिता, पिडीता, रवी शिंदे व प्रदीप या चौघांनी एकत्र मिळून जेवन केले. रवी शिंदे त्यानंतर ड्युटीवर गेला. दि. ५ जून रोजी दुपारी रवी शिंदे, पिडीता व सुनिता तीघे घरी होते. भाजी आणण्याचे निमित्त करून सुनिता बाहेर गेली. त्यावेळी रवी शिंदे याने पिण्यासाठी पाणी मागितले. त्यावेळी पिडीता पाणी आणण्यासाठी किचनमध्ये गेल्यानंतर रवी याने अचानक पिडीतेला पाठीमागुन डावा हात पकडून आय लव यु म्हणाला. तु मला खूप आवडतेस, मी सुनिताला सांगून तुला मुद्दाम बोलावले आहे. ये जवळ म्हणून ओढले व किस घेण्याचा प्रयत्न केला. तु मला स्वीकार, मी तुला खूप खूश ठेवेन. हा प्रकार कोणालाही सांगू नको म्हणाला.
६ जून रोजी रात्री रवी शिंदे ड्युटीवरून घरी आला. सर्वांनी जेवन केल्यानंतर सुनिता पिडीतेला म्हणाली की, तु आणि रवी एकाच बेडरूममध्ये झोपा. तेंव्हा मी याला विरोध केला. त्यावेळी ही घटना कोणालाही सांगु नको, अशी धमकी सुनिताने पिडीतेला दिली. त्यानंतर सुनिता, रवी शिंदे हे दोघे सतत पिडीतेला फोनवरून सतत धमकी देऊ लागले. घडलेली घटना कोणाला सांगितल्यास नागपूर येथून लोक बोलावून तुला व तुझ्या पतीला जीवे मारू म्हणून धमकी देऊ लागले. सततच्या धमक्याला कंटाळलेल्या पिडीतेने संभाजीनगर येथील उस्मानपुरा पोलीस ठाण्यात सुनिताच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
रवी शिंदे, सुनिता म्हस्के, प्रदीप या तीघांनी संगणमत करून ५ व ६ जून रोजी पिडीतेचा विनयभंग केला. या प्रकरणी पिडीतेने दिलेल्या फिर्यादीवरून दि. २२ रोजी विनयभंगासह विविध कलमान्वये तीघांच्या विरोधात भूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नव्हती.