29.1 C
Latur
Sunday, December 22, 2024
Homeलातूरविघ्नहर्त्याचे हर्षोल्हासात आगमन

विघ्नहर्त्याचे हर्षोल्हासात आगमन

लातूर : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसाांसून आतुरतेने वाट पाहणा-या विघ्नहर्त्या, लाडक्या गणपती बाप्पाचे दि. ७ सप्टेंबर रोजी वाजत-गाजत हर्षोल्हासात आगमन झाले. बाप्पाच्या स्वागतासाठी चिमुकल्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनीच जय्यत तयारी केलेली होती. सर्वत्र चैतन्यमय आणि उत्साही वातावरण संचारले होते. भक्तांच्या आनंदाला उधान आले होते. सार्वजनिक गणेश मंडळांसोबतच परंपरेनूसार घरोघरी बाप्पाची भक्तिमय वातावरणात प्रतिष्ठापना करण्यात आली.
‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष, पारंपारिक वाद्यवृंद, ढोल-ताशांचा दणदणाट, गुलालाची उधळण आणि फटाक्यांच्या आतषबाजीत शनिवारी गणरायाचे उत्साही थाटात आगमन झाले. भारतीय संस्कृती जशी सण, उत्सव आणि सोहळ्यांनी सजलेली आहे तसेच ती विविध सांस्कृतीक आणि धार्मिक मुल्यांनी अलंकारीतही आहे. या सण, उत्सवांमध्ये गणेशोत्सवाला विशेष महत्व आहे.
या उत्सवामुळे सर्व भाविक भक्तांत उत्साह संचारलेला असतो. विशेषत: तरुणांचा उत्साह ओसंडून वाहत असतो. या उत्सवाची जय्यत तयारी गेल्या एक-दीड महिन्यापासूनच होती. त्यामुळे संपूर्ण लातूर शहर बाप्पामय झाले आहे. शहरातील विलासराव देशमुख मार्ग, सुभाष चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बार्शी रोड, राजीव गांधी चौक, जुना रेणापूर नाका, पु. अहिल्यादेवी होळकर चौक यासह शहरातील चारही दिशांना पाच-सहा दिवसांपासूनच गणरायाच्या स्वागातासाठी आवश्यक असणा-या विविध वस्तूंचे स्टॉल्स लावण्यात आलेले होते. शनिवारी सकाळपासूनच  या स्टॉल्सवर भक्तांची एकच गर्दी झाली. ‘श्री’ ची प्रतिष्ठापना घरोघरी झाली. मोठ्या गणेश मंडळांनी गणेशमुर्तींचे बुकिंग करुन ठेवले होते. या मंडळांनी वाजत-गाजत गणेशमुर्त्यां नेऊन प्रतिष्ठापना केली.
‘श्री’ची प्रतिष्ठापना झाली. आता येत्या ११ दिवसांत गणेशोत्सव विविध धार्मिक व सामाजिक विधायक उपक्रमांनी साजरा केला जाणार आहे. शहरातील मोठ्या गणेश मंडळांनी प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी कोरोना प्रतिबंधक लसीकरण, प्लास्टिकमुक्ती, कचरामुक्ती, वृक्षारोपन, जलपुनर्भरण, स्वच्छता, रक्तदान, अन्नदान, बेटी बजाओ, बेटी पढाओ आदी विविध विषयांवर व्याख्याने, असे विविध उपक्रम हाती घेतले आहेत. यंदा आतापर्यंत पाऊस चांगला झाला असल्याने  गणेश भक्तांमध्ये उत्साह आहे. गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्थीपर्यंत म्हणजेच ७ सप्टेंबर ते १७ सप्टेंंबर या कालवधीत विविध धार्मिक कार्यक्रमांसोबतच सामाजिक कार्यक्रमांचीही रेलचेल असणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR