27.5 C
Latur
Sunday, July 14, 2024
Homeलातूरविद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यासाठी सक्रियपणे कार्य करावे

विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यासाठी सक्रियपणे कार्य करावे

लातूर : प्रतिनिधी
उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी नोडल महाविद्यालयाची असलेली भूमिका, सोपवलेली जबाबदारी याबद्दल माहिती सांगून इंटर्नशिप धोरणाची अंमलबजावणी सर्व महाविद्यालयांनी कशी करायची, विद्यार्थ्यांचे करिअर कसे घडविले पाहिजे, कॉलेजसमोरील आव्हानांना तोंड कसे द्यायचे, नॅकचा दर्जा उंचावणे आणि पदवी व पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यासाठी सक्रियपणे कार्य केले पाहिजे, असे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे मुख्य सचिव यांचे विशेष अधिकारी शक्तीसिंग चौहान यांनी केले.
दयानंद विज्ञान महाविद्यालयात ‘इंटर्नशिप धोरण अंमलबजावणी-राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ या विषयावर जिल्हास्तरीय मार्गदर्शनपर गुगल मिटच्या माध्यमातून ऑनलाईन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सल्लागार डॉ. विजय जोशी, नांदेड विभागीय सहसंचालक डॉ. किरणकुमार बोंदर, प्राचार्य डॉ. जयप्रकाश दरगड, उपप्राचार्य डॉ. सिद्धेश्वर बेल्लाळे, नोडल ऑफिसर डॉ. युवराज सारणीकर, इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. मेघा पंडित, तांत्रिक साहाय्यक डॉ. रोहिणी शिंदे, डॉ. राहुल मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी डॉ. जोशी यांनी इंटर्नशिपची अंमलबजावणी कशी करता येईल याबद्दल मार्गदर्शन करत बँंिकग सेक्टर, खाजगी कंपन्या, विविध संस्था, बचत गट अशा सर्व क्षेत्रातील इंटर्नशिपची यादी तयार करून विद्यार्थ्यांना स्वत:च्या पायावर सक्षमपणे उभे केले पाहिजे असेही त्यांनी सांगितले.
प्राचार्य डॉ. दरगड यांनी दयानंद विज्ञान महाविद्यालयाची लातूर जिल्ह्यासाठी नोडल कॉलेज म्हणून निवड केलेली आहे. ही आमच्यासाठी अभिमानास्पद बाब असून इंटर्नशिपमधला लातूर शैक्षणिक पॅटर्न निर्माण करू आणि त्यांची यशस्वी अंमलबजावणी करू असे आश्वासनही त्यांनी दिले. प्रत्येक महाविद्यालयांनी अ‍ॅक्टिव्ह राहून इंटर्नशिप धोरण अंमलबजावणी करण्यासाठी सक्रियपणे कार्यरत राहावे असेही त्यांनी आवाहन केले. सूत्रसंचालन प्रा.मेघा पंडित यांनी केले तर नोडल ऑफिसर डॉ.युवराज सारणीकर यांनी आभार मानले. यावेळी इंटर्नशिप धोरण अंमलबजावणी- एनईपी-२०२० संदर्भातील शंका-कुशंकाचे निरसनही प्रश्नोत्तर स्वरूपात करण्यात आले. याप्रसंगी लातूर जिल्ह्यातील महाविद्यालयाचे सर्व प्राचार्य, नोडल ऑफिसर व महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR