26.4 C
Latur
Saturday, February 22, 2025
Homeमहाराष्ट्रविद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळा परिसरात ‘दामिनी पथक’

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळा परिसरात ‘दामिनी पथक’

मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगामार्फत ‘बाल रक्षा अभियानाचा’ शुभारंभ सह्याद्री अतिथीगृहात करण्यात आला. यावेळी शाळा परिसरात दामिनी पथक नेमणार असल्याचेही शिक्षणमंत्री दादा भुसे म्हणाले.
दरम्यान, शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सरकार तत्पर आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळा परिसरात दामिनी पथक नेमण्यात येणार आहे, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केली.

तर महिला आणि बालकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यावर उपाययोजना आखण्यासाठी तरुणांचे नेतृत्व वाढवण्याची गरज आहे, त्यांच्या माध्यमातून कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल आणि त्याद्वारे बालकांना सुरक्षित करण्यास सहकार्य लाभेल, असा विश्वास विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगामार्फत ‘बाल रक्षा अभियानाचा’ शुभारंभ सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आला. त्यावेळी गो-हे आणि भुसे बोलत होते. यावेळी आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शाह उपस्थित होत्या.

आयोगाच्या जनजागृतीपर पोस्टरचे अनावरण महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या जनजागृतीपर पोस्टरचे अनावरण, बालरक्षा अभियान प्रशिक्षण पुस्तिकेचे प्रकाशन, चिराग अ‍ॅपचे डिजिटल पद्धतीने अनावरण विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गो-हे आणि शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आले.

पालक-शिक्षण समितीचे मॉनिटरिंग
बालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल, अशी माहिती उपसभापती डॉ. गो-हे यांनी दिली. प्रत्येक शाळेत नेमण्यात आलेल्या पालक-शिक्षण समितीचे ऑनलाईन मॉनिटरिंग करण्यात येणार आहे. मुलांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी त्यांचे समुपदेशन करणे आवश्यक आहे आणि हेच समुपदेशन समवयस्क मुलांमार्फत झाल्यास ते नक्कीच प्रभावी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शासन आयोगास सर्व सहकार्य करेल
लहान बालकांच्या समस्यांबाबत तक्रारी नोंदवायच्या असतील तर चिराग अ‍ॅपद्वारे त्या नोंदविता येतील, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली. या माध्यमातून ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील प्रत्येक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन आयोगास सर्व सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. शिक्षकांनाही प्रशिक्षण देण्यात येईल, सखी सावित्री समितीचा विस्तार करण्यात येणार आहे. पोक्सो कायद्यात अधिक कठोर तरतुदी करण्यात येणार असल्याचे भुसे यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR