27 C
Latur
Friday, March 14, 2025
Homeपरभणीविद्यार्थ्यांना प्रश्न विचारू द्या : ऋषिकेश शिंदे

विद्यार्थ्यांना प्रश्न विचारू द्या : ऋषिकेश शिंदे

मानवत : विद्यार्थ्यांच्या मनात जिज्ञासा असल्यामुळे त्यांना अनेक प्रश्न पडतात व ते प्रश्न विचारत असतात. त्यामुळे त्यांना प्रश्न विचारू द्या, असे प्रतिपादन सहायक पोलीस अधिक्षक ऋषिकेश शिंदे यांनी केले.

शहरातील सौ. रामकंवर द्वारकादास लड्डा इंग्रजी शाळेतील वार्षिक स्नेहसंमेलनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ज्योतिर्गमय इंग्लिश स्कूल परभणीच्या संस्थापिका प्रिया ठाकूर, पाथरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव बालकिशन चांडक, सहसचिव विजयकुमार दलाल, संचालक संजय लड्डा, संजय बांगड, ज्ञानेश कत्रुवार, विशाल दलाल, प्रणव बांगड, सहायक पोलीस निरीक्षक संदीप बोरकर यांची उपस्थिती होती.

पुढे बोलताना शिंदे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी कुठेही न्यूनगंड बाळगू नये. विद्यार्थ्यांनी सुंदर दिसण्यापेक्षा त्यांचे व्यक्तिमत्व चांगले घडेल याकडे लक्ष दिले पाहिजे. त्यांच्यावर मुल्यसंस्कार करणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानात प्रगती होत आहे. मात्र विद्यार्थ्यांना त्याचा सकारात्मक उपयोग करायला शिकवले पाहिजे असे सांगितले.

यावेळी चांडक यांनी सांगितले की, संस्थेने नेहमीच ग्रामीण भागातील पालकांच्या गरजा ओळखून शैक्षणिक सुविधा निर्माण केल्या आहेत. भविष्यातही संस्था कर्तव्यभावनेने कार्यरत असणार आहे असे सांगितले. यावेळी प्रिया ठाकूर यांनीही मनोगत व्यक्त केले. शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी सामाजिक संदेश देणारे कलाविष्कार सादर केले.

अन् प्रेक्षकांचे डोळे पाणावले
यावेळी ज्येष्ठ नागरिकांचा सांभाळ न करता त्याना वृद्धाश्रमात पाठवल्यानंतर त्यांच्या मनातील घालमेल ओल्ड एज थीम मधून सादर करण्यात आली. अतिशय प्रभावी पणे मांडल्या गेलेल्या या कलाविष्काराने अनेक प्रेक्षकांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR