चेन्नीथला यांच्या उपस्थितीत उद्या बैठक
मुंबई : प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यासाठी काँग्रेसने उद्या, शुक्रवारी महत्वाची बैठक बोलावली आहे. काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला आणि केंद्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्या उपस्थितीत होणा-या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्याबाबत चर्चा होणार आहे.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली १९ जुलैला सकाळी १० वाजता गरवारे क्लब येथे होणा-या या बैठकीला काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, सरचिटणीस मुकुल वासनिक, अविनाश पांडे, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गट नेते सतेज पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे, नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, प्रणिती शिंदे, कुणाल पाटील यांच्यासह राज्यातील प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.
त्यानंतर दुपारी दोन वाजता प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय असलेल्या टिळक भवन येथे राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, जिल्हा प्रभारी, खासदार, आमदार, आघाडी संघटनांचे प्रमुख यांची संयुक्त बैठक होणार आहे. या बैठकीत नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे विश्लेषण केले जाणार असून, आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच मतदार याद्या पुनरिक्षणाचा आढावा तसेच संघटनात्मक बाबींचा आढावा घेतला जाणार आहे.
फुटीर आमदारांवर कारवाई ?
उद्याच्या बैठकीदरम्यान रमेश चेन्नीथला आणि के. सी. वेणुगोपाल हे विधान परिषद निवडणुकीतील मतांच्या फाटाफुटीबद्दल पक्षातील ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करण्याची शक्यता आहे. १२ जुलै रोजी पार पडलेल्या निवडणुकीत काँग्रेसची चार मते फुटल्याचे स्पष्ट झाले आहे. पक्षातील उर्वरित ३ आमदार पक्षाच्या किंवा आघाडीच्या उमेदवाराला मतदान करणार नाहीत, याची कल्पना वरिष्ठ नेत्यांना देण्यात आली होती. त्यामुळे या एकूण सात आमदारांवर कारवाई करण्याबाबत पक्षातून दबाव वाढत आहे. परिणामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या पक्षाशी एकनिष्ठ नसलेल्या आमदारांवर कोणती कारवाई करावी, याबाबत चेन्नीथला आणि वेणुगोपाल हे निवडक नेत्यांशी चर्चा करून त्यांची मते जाणून घेण्याची शक्यता आहे.