नांदेडच्या सर्वच्या सर्व ९ जागा जिंकणार, पटोले यांना विश्वास
नांदेड : प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणुकीत काँगे्रस तथा महाविकास आघाडीच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील सर्वच ९ जागा जिंकण्याच्या तयारी लागा, असे सांगत केंद्रासह राज्यातील भाजपाचे सरकार सर्व सामान्य नागरिक आणि शेतकरी विरोधी आहे. या सरकारला बाजूला करा असे आवाहन काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यातील पदाधिका-यांची आढावा बैठक येथील भक्ती लॉन्स येथे आज पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, माजी मंत्री नसीमखान, खा. वसंतराव चव्हाण, आ. मोहन हंबर्डे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अब्दुल सत्तार, काँग्रेसचे दोन्ही जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम, हनमंत पाटील बेटमोगरेकर, एनएसयूआयचे महाराष्ट्र अध्यक्ष अमीर खान यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
स्वत:ला मोठे नेते म्हणणारे सोडून गेले तरी पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बळावर नांदेड पुन्हा काँगे्रसचा बालेकिल्ला बनला आहे. आज बैठकीच्या माध्यमातून जो जोश पाहायला मिळाला, तो कायम ठेवून विधानसभेत काम करावे. नांदेडमध्ये कोणाच्या मनावर नाही तर गुणवत्तेच्या निकषावर उमेदवारी मिळेल, असा विश्वास पटोले यांनी दिला. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खोटे बोलण्यात एक्सपर्ट आहेत. शेतक-यांना बारा काय आठ तास वीज देऊ शकत नाहीत तर २४ तास कसे देतील, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
यावेळी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी आजच्या बैठकीतील कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता ही आगामी विधानसभेची विजयी सभा आहे, असे वाटत असल्याचे म्हटले. नांदेडची मालकी समजणारे मोठे मोठे लोक काँगे्रस सोडून गेले, पण सच्चा कार्यकर्ता असलेल्या वसंतराव चव्हाण यांना जनतेने निवडून दिले. यामुळे नांदेड हा कै. शंकरराव चव्हाण आणि काँगे्रसचाच बालेकिल्ला असल्याचे सिद्ध झाले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी करण्याच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाकडून विभागीय बैठका घेण्यात येत आहेत. या बैठकीची सुरुवात लातूरपासून करण्यात आली. लातूर आणि नांदेडचा हा उत्साह विधानसभेत कायम ठेवून विरोधकांना त्यांची जागा दाखवून द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी माजी मंत्री नसीम खान आणि खा. वसंतराव चव्हाण यांचेही भाषण झाले.दरम्यान काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार दिलीप पाटील बेटमोगरेकर यांनी आगामी विधानसभाच नव्हे तर कायम माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांना नांदेडचे पालकत्व पक्षश्रेष्ठीने द्यावे, अशी अपेक्षा थेट भाषणातून व्यक्त केली.
विलासरावांनी तुम्हाला संधी
दिली, तुम्ही साथ का सोडली?
आमदार अमित देशमुख यांचा अशोकरावांना सवाल
महाराष्ट्रात जेव्हा मुख्यमंत्री बदलाच्या हालचालींना वेग आला, तेव्हा स्व. लोकनेते विलासराव देशमुख यांनी त्यांचे वजन मराठवाड्याचे सुपुत्र म्हणून तुमच्या पारड्यात टाकले. जनतेचीही तुम्हाला साथ होती. असे असताना तुम्ही काँग्रेसची साथ का सोडली, असा सवाल माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी भाजपवासी झालेले अशोक चव्हाण यांना विचारला. अशोकाची पतझड झाली आणि वसंत फुलला, या स्टाईलने अमित देशमुख यांनी जोरदार फटकेबाजी केली. स्व. शंकरराव चव्हाण यांनी विलासराव देशमुख यांना ताकद दिली होती. हे विलासराव देशमुख विसरले नव्हते. याची आठवण ठेवत तुम्हाला मुख्यमंत्रिपदाची संधी दिली असताना तुम्ही साथ का सोडली, असे ते म्हणाले. जनतेने नांदेडचा बालेकिल्ला पुन्हा काँगे्रसला मिळवून दिला. आगामी विधानसभा निवडणूकीत आघाडीच्या माध्यमातून ९ जागा निवडून आणू या, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कार्यकर्त्यांनी कोणालाही न घाबरता विधानसभा जिंकण्यासाठी तयारीला लागावे, असे आवाहनही त्यांनी केले.