११ जागांसाठी निवडणूक, ‘क्रॉस व्होटिंग’च्या भीतीने सर्व पक्ष गॅसवर
मुंबई : प्रतिनिधी
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी शुक्रवारी निवडणूक होत असून अतिरिक्त मतांसाठी काँग्रेस वगळता सर्वच पक्ष कामाला लागले असल्याने कोणाचा नेम लागणार व कोणाचा गेम होणार या बद्दलची उत्सुकता शिगेला गेली आहे. ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात असून यातील एकाचा पराभव अटळ आहे. अजित पवार यांच्या उमेदवाराचा पराभव करण्यासाठी शरद पवार गटाचे सर्वच नेते कामाला लागले आहेत तर दुसरीकडे शेकापच्या जयंत पाटील यांच्या करामतीमुळे भाजपाचा एक उमेदवार पडेल, असेही दावे केले जात आहेत. भाजपाचे सदाभाऊ खोत, अजित पवार गटाचे शिवाजीराव गर्जे, शेकापचे जयंत पाटील व शिंदे सेनेचे कृपाल तुमाने ‘डेंजर झोन’मध्ये असल्याची चर्चा आहे.
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी उद्या निवडणूक होत आहे. महायुतीचे ९ व महाविकास आघाडीचे ३ उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेस वगळता सर्व पक्षांना मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी बाहेरून रसद लागणार असल्याने एकेका मताला मोठी किंमत आली आहे. गुप्त मतदानात दगाफटका होऊ नये, यासाठी विशेष काळजी घेतली जात असून काँग्रेस वगळता सर्व पक्षांनी आपल्या आमदारांची पंचतारांकित हॉटेलात खास बडदास्त ठेवली आहे. सर्वच पक्षांकडून आपल्याकडे आवश्यक मते असल्याचा दावा केला जात असल्याने पडणार कोण, हाच एकमेव विषय आज विधिमंडळात चर्चेला होता.
विधानसभेतील २८८ पैकी १४ जागा सध्या रिक्त आहेत. त्यामुळे १७४ आमदार या निवडणुकीत मतदान करणार असून विजयासाठी २३ (२२.८४) आमदारांचे पाठबळ लागणार आहे. विधानसभेत सध्या भाजपाचे १०३, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ३९, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे ४०, काँग्रेसचे ३७, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे १५ व राष्ट्रवादीच्या पवार गटाचे १२ आमदार आहेत. याशिवाय अपक्ष व छोट्या पक्षांचे २८ आमदार आहेत. काँग्रेसकडून केवळ प्रज्ञा सातव या एकमेव उमेदवार असल्याने त्यांना इतरांच्या मदतीची आवश्यकता नाही. काही मते फुटली तरी त्या निवडून येऊ शकतील, अशी स्थिती आहे. काँग्रेसने आपली अतिरिक्त मते ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकर यांना देण्याचे मान्य केले आहे.
खबरदारी म्हणून पहिल्या पसंतीची सर्व मते प्रज्ञा सातव यांना देऊन दुसरी पसंती नार्वेकर यांना दिली जाईल. तसे झाल्यास १० ते १२ मते नार्वेकर यांना मिळतील. ठाकरे गटाची स्वत:ची मते व काँग्रेसकडून मिळालेल्या अतिरिक्त मतांच्या आधारे नार्वेकर निवडून येऊ शकतील. मात्र मते फुटली तर पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, डॉ. परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत या ५ उमेदवारांपैकी कोणालाही फटका बसू शकतो. पंकजा मुंडे यांना क्रमांक एकचा कोटा देऊन असंतुष्ट लोकांकडून दगा फटका होणार नाही, याची काळजी घेतली जात असल्याचे सांगितले जात आहे. या स्थितीत सदाभाऊ खोत यांची काळजी वाढली आहे.
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने २ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत व त्यांच्या विजयासाठी बाहेरून काही मतांची जुळवाजुळव केली आहे; पण पक्ष फुटला तेव्हा सोबत आलेले काही लोक परतीच्या वाटेवर असून ते जाताजाता वाट लावून तर जाणार नाहीत ना, हा धोका आहे. शिंदे गटाने २ उमेदवार उभे केले असून त्यांना काही मते बाहेरून मिळवताना पक्षातील मते फुटणार नाहीत याचीही काळजी घ्यावी लागेल. ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांचे अनेकांशी व्यक्तिगत संबंध आहेत त्यामुळे क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अजित पवारांना ६, जयंत
पाटील यांना १० मतांची गरज
अजित पवार गटाचे २ उमेदवार रिंगणात असून त्यांना बाहेरील ६ मतांची गरज आहे. शेकापचे जयंत पाटील यांना शरद पवार गटाने पाठिंबा दिला आहे. पवार गटाचे १२ आमदार आहेत. शेकापचे एक आमदार आहेत. ही सर्व मते इकडे तिकडे न जाता त्यांना मिळाली तरी त्यांना आणखी १० मते लागणार आहेत. ही ती कोणाची खेचून आणणार यावर निवडणुकीत पडणारा बारावा उमेदवार कोण असेल हे ठरणार आहे.
फाटाफूट टाळण्यासाठी
आमदार हॉटेलवर
मतांची फाटाफूट होऊ नये यासाठी शिंदे गटाने आपल्या आमदारांना ताज लँड इंड येथे तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने हॉटेल ललित या पंचतारांकित हॉटेलात आपल्या आमदारांची व्यवस्था केली. भाजप आणि कॉंग्रेसनेही सर्व आमदारांना हॉटेलवर ठेवले. त्यातच गुरुवारी रात्री हॉटेलवर बैठक घेऊन चर्चाही केली. मात्र, राष्ट्रवादीचे आमदार कुठल्याही हॉटेलमध्ये थांबले नसल्याचे सांगण्यात आले.