नागपूर : प्रतिनिधी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही आपलेसे वाटतात. विरोधी पक्षांच्या नेत्यांकडूनही गडकरी यांच्यावर स्तुतिसुमने उधळली जातात. विरोधी असो वा आपल्या पक्षाचा ते कधीही निधी देण्यात भेदभाव करत नाहीत, असेही बोलले जाते. मात्र, आता विरोधी पक्षाकडून मला पंतप्रधानपदाची ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट नितीन गडकरी यांनी केला आहे.
विरोधी पक्षातील एका बड्या नेत्याने संपर्क साधून, तुम्ही पंतप्रधान व्हा, आम्ही पाठिंबा देतो, अशी ऑफर दिली होती. पण, मला या पदाची लालसा नाही, असे सांगून ऑफर धुडकावल्याचे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. आता मात्र, तो बडा नेता कोण? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. नागपूर पत्रकार संघाच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात गडकरी बोलत होते.
नितीन गडकरी म्हणाले, मी कुणाचेही नाव घेणार नाही. मात्र, विरोधी पक्षातील एका बड्या नेत्याने मला ऑफर दिली होती की, जर तुम्ही पंतप्रधान होणार असाल, तर आम्ही पाठिंबा द्यायला तयार आहोत. पण, मी त्यांना सांगितले, तुम्ही मला पाठिंबा का द्याल? आणि मी तुमचा पाठिंबा का घेऊ?
पंतप्रधान होणे हे माझ्या जीवनाचे लक्ष्य कधीच नाही. मी माझ्या पक्षाशी एकनिष्ठ आहे. पदासाठी मी पक्षाशी तडजोड कदापि करणार नाही. माझ्या दृढनिश्चयच माझ्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, असे गडकरी यांनी सांगितले.
मी कुणाचेही नाव घेणार नाही
नागपुरातील एका कार्यक्रमात नितीन गडकरी म्हणाले, मला एक घटना आठवते – मी कोणाचेही नाव घेणार नाही. पंतप्रधान होणे हे माझ्या आयुष्याचे ध्येय नाही. मी माझ्या श्रद्धा आणि माझ्या संस्थेशी एकनिष्ठ आहे आणि मी कोणत्याही पदासाठी तडजोड करणार नाही, कारण माझा दृढनिश्चय माझ्यासाठी सर्वांत महत्त्वाचा आहे.