22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeलातूर‘विलासराव वृक्ष’ उपक्रमाच्या माध्यमातून जयंती साजरी

‘विलासराव वृक्ष’ उपक्रमाच्या माध्यमातून जयंती साजरी

लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री तथा लोकनेते विलासराव देशमुख यांच्या जयंती निमित्ताने वसुंधरा प्रतिष्ठानने ‘विलासराव वृक्ष’ ही अनोखी संकल्पना राबवून लोकनेते विलासराव देशमुख यांना अनोख्या पद्धतीने अभिवादन केले. विलासराव देशमुख यांच्या जयंतीदिनी २०२१ साली लावलेल्या पिंपळ वृक्षाखाली आज त्यांची जयंती साजरी करून वृक्ष लागवड आणि संवर्धन ही काळाची अत्यंत महत्त्वाची गरज आहे, असा संदेश वसुंधरा प्रतिष्ठानने या माध्यमातून दिला आहे.

वसुंधरा प्रतिष्ठान ही सामाजिक संस्था गेल्या आठ वर्षांपासून लातूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये वृक्ष लागवड आणि संवर्धन हे काम करते आहे. वसुंधरा प्रतिष्ठानने आजवर अनेक नाविन्यपूर्ण संकल्पना मांडून वृक्षांची चळवळ घराघरात नेण्यासाठी प्रयत्न केला आहे. नाविन्यपूर्ण उपक्रमात झाडांचा वाढदिवस, झाडाचा गणपती, एक गणेश मंडळ: ११ वृक्ष उपक्रम, एक विद्यार्थी: एक वृक्ष उपक्रम, सेल्फी विथ ट्री, खिळेमुक्त झाड अभियान, प्रत्येक सण झाडांसमवेत, झाडांसोबत मैत्री दिवस आदींसह विविध उपक्रम यशस्वी पद्धतीने राबविले आहेत.

लोकनेते विलासराव देशमुख यांच्या जयंती निमित्ताने गेल्या आठ वर्षांपासून वसुंधरा प्रतिष्ठान तर्फे विलासराव वृक्ष उपक्रम राबवून वृक्षारोपण आणि संवर्धन केले जाते. लातूर शहरातील महात्मा गांधी चौकात लोकनेते विलासराव देशमुख यांच्या जयंती निमित्ताने कोरोना काळात अर्थात २०२१ मध्ये वड आणि पिंपळ वृक्षांची लागवड करण्यात आली होती. रविवारी या झाडांच्या सानिध्यात लोकनेते विलासराव देशमुख यांची जयंती साजरी करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी वसुंधरा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा.योगेश शर्मा, उपाध्यक्ष रामेश्वर बावळे, सोशल मीडिया प्रमुख शिवाजी निरमनाळे, वुमन्स ंिवगच्या अध्यक्ष प्रियाताई मस्के, सदस्य नरसिंग सूर्यवंशी, शिवाजी जाधव, योगेश शिंदे यांच्यासह या भागातील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या भागातील व्यापारी आणि त्यांच्या आस्थापनेत काम करणा-या कर्मचा-यांनी या झाडांची देखभाल केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR