25.3 C
Latur
Friday, June 21, 2024
Homeलातूरविवेकी व्यक्तीकडूनच बुद्धीचा सकारात्मक वापर होतो

विवेकी व्यक्तीकडूनच बुद्धीचा सकारात्मक वापर होतो

लातूर : प्रतिनिधी
मानवाकडे केवळ बुद्धी असून चालत नाही तर विवेकही असावा लागतो. विवेकानुसार वागणारा व्यक्ती बुद्धीचा सकारात्मक वापर करतो. मन सकारात्मक व परिपूर्ण असावे यासाठी मार्गदर्शन देण्याचे काम ग्रंथांच्या माध्यमातून केले जाते, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य भैय्याजी जोशी यांनी केले. भारतीय शिक्षणावर आधारित ज्ञानसागर महाप्रकल्पाच्या १०५१ ग्रंथांच्या लोकार्पण सोहळ्यात भैय्याजी जोशी बोलत होते. भारतीय शिक्षण प्रसारक संस्था व श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा कार्यक्रम दयानंद सभागृहात संपन्न झाला. या कार्यक्रमास पुनरुत्थान विद्यापीठाच्या कुलपती श्रीमती इंदुमतीताई काटदरे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देवगिरी प्रांताचे संघचालक अनिलजी भालेराव, भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यवाह डॉ. हेमंतजी वैद्य, राजा नारायणलाल लाहोटी विद्यालयाचे चेअरमन आनंद लाहोटी यांची मंचावर उपस्थिती होती.

यावेळी मार्गदर्शन करताना भैय्याजी जोशी म्हणाले की, शिक्षण ही आयुष्याच्या अंतापर्यंत चालणारी निरंतर प्रक्रिया आहे. शिक्षणाला वेळ आणि विषयाचे बंधन नाही. परंतु पदवी मिळविण्यासाठी घालून देण्यात आलेल्या उत्तीर्णतेच्या निकषामुळे शिक्षणाचा आत्मा संपलेला आहे.ज्ञान मिळविण्याचा मार्ग सोपा नाही. शिक्षणाला वय आणि विषयाचे कसलेही बंधन नाही. मानव आयुष्यभर विद्यार्थी असतो. जीवनाच्या अंतापर्यंत शिकत रहावे, असे भारतीय शास्त्र सांगतात. केवळ प्रमाणपत्र मिळाल्याने शिक्षण संपत नाही,असेही ते म्हणाले.

भैय्याजी जोशी यांनी सांगितले की,आजचे शिक्षण केवळ माहिती देणारे आहे. त्यातून ज्ञान मिळत नाही. शिक्षणासोबतच विवेकही असावा लागतो. विवेकानुसार वागणारा व्यक्ती आपल्या बुद्धीचा सकारात्मक वापर करतो. आज विद्या व ज्ञान ही व्यवहाराची साधने झाली आहेत.कालानुरूप रोजगार देणारे शिक्षण आवश्यक असले तरी त्यावर बंधने नको आहेत. शिक्षण क्षेत्र हा एक परिवार आहे. शिक्षक, विद्यार्थी व पालक हे त्याचे घटक असून चांगला माणूस बनविणारे शिक्षण देणे काळाची गरज आहे. शैक्षणिक धोरण ठरवणे हे शासनाचे काम आहे. ही धोरणे ठरवताना त्या क्षेत्रातील जाणकारांचा सल्ला घेऊन व्यक्तीला परिपूर्ण करणारी शिक्षण व्यवस्था निर्माण केली पाहिजे, असेही ते म्हणाले.

मन हा घटक शिक्षणात महत्त्वाची भूमिका बजावतो. शिक्षणामुळे वैचारिकताही तयार होते. मन सकारात्मक रहावे यासाठी मार्गदर्शनाची गरज असते. हे मार्गदर्शन देऊन सकारात्मकतेचा मार्ग अधिक प्रशस्त करण्याचे काम ग्रंथ करत असतात. त्या अनुषंगाने या ग्रंथांची निर्मिती झालेली असल्याचेही भैय्याजी जोशी म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत असताना पुनरुत्थान विद्यापीठाच्या कुलपती श्रीमती इंदुमतीताई काटदरे म्हणाल्या की, एकविसाव्या शतकात भारताला कुठल्या प्रकारचे शिक्षण हवे आहे त्याचा विचार करून विद्यापीठ कार्यरत आहे. त्यासाठी ६० वर्षांची कार्य योजना तयार केली आहे.

भारतीय प्रतिमानानुसार न चालणारे शिक्षण आज मिळत आहे. ते बदलून संपूर्णत: भारतीय विद्या व ज्ञान देणारे शिक्षण मिळण्याची गरज आहे. सामान्यजणांची बुद्धी, मन आणि वाणी या माध्यमातून शिक्षणाची प्रक्रिया सुरू असते. त्यासाठी संशोधन आवश्यक आहे. एकात्म मानव दर्शन आणि त्यावर आधारित शिक्षणाचे समग्र प्रतिमान निर्माण करणारी शिक्षण पद्धती गरजेची आहे. यासाठीच ज्ञानसागर महाप्रकल्पाच्या माध्यमातून १०५१ ग्रंथांची निर्मिती करण्यात आली आहे. त्या ग्रंथांचे लोकार्पण येथे होत असल्याचे श्रीमती इंदुमतीताई म्हणाल्या.
या कार्यक्रमास भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्रजी आलूरकर, मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मीरमणजी लाहोटी, संचालक मंडळाचे अध्यक्ष शैलेशकुमार लाहोटी, सचिव अ‍ॅड. आशिष बाजपाई, केशवराज शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष धनंजय कुलकर्णी-तुंगीकर इत्यादी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR