22 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रशरदचंद्र पवार पक्षात धुसफूस?

शरदचंद्र पवार पक्षात धुसफूस?

- जयंत पाटील विरुद्ध रोहित पवार? - श्रेयवादावरून समर्थकांमध्ये जुंपली

पुणे : प्रतिनिधी
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील मतदारांनी महायुतीच्या विरोधात आणि महाविकास आघाडीच्या बाजूने आपला कौल दिला. त्यातही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कामगिरी अधिक उजवी ठरली. पक्षाने १० पैकी ८ जागा जिंकत इतर पक्षांपेक्षा चांगला स्ट्राईक रेट असल्याचे दाखवून दिले. १० जून रोजी पक्षाच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने झालेल्या भाषणातून आता श्रेयवादाचे राजकारण होत असल्याचे समोर आले आहे. तसेच पक्षात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार रोहित पवार यांच्यात गट पडल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवरून दिसून येत आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या चांगल्या कामगिरीनंतर पक्षाच्या मुख्यालयाबाहेर काही कार्यकर्त्यांनी जयंत पाटील ‘किंगमेकर’ ठरल्याचे बॅनर लावले. या बॅनरवरून पक्षातील काही नेत्यांमध्ये नाराजी असल्याचे दिसून आले. १० जून रोजी अहमदनगर येथे पक्षाचा २५ वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यावेळी रोहित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विजयाचे श्रेय हे शरद पवार आणि सर्व कार्यकर्त्यांच्या एकत्रित मेहनतीचे फळ असल्याचे सांगितले. रोहित पवार आपल्या भाषणात म्हणाले, पुढील काळात कुणी स्वत:ला किंगमेकर म्हणवून घेईल. पण हा विजय कुणा एका नेत्यामुळे झालेला नसून सामान्य कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे पक्षाला घवघवीत यश मिळाले. तसेच शरद पवार यांनी या वयात ज्या तडफेने प्रचार केला, त्याचेही आपल्याला कौतुक करावे लागेल.

शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी ६ जून रोजी एक्सवर एक पोस्ट टाकून पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे किंवा रोहित पवार यांची नियुक्ती करावी, अशी मागणी केली होती. या मागणीचे निश्चित कारण काय? याबद्दल त्यांनी कोणतेही सूतोवाच केले नव्हते. या पोस्टरवर उलटसुलट प्रतिक्रिया आल्यानंतर त्यांनी पुन्हा त्यावर रिप्लाय देत, हे माझे वैयक्तिक मत असल्याचा खुलासा केला.

विकास लवांडे यांच्या पोस्टनंतर पक्षाचे तरुण प्रवक्ते आणि जयंत पाटील यांच्याशी जवळीक असलेल्या अ‍ॅड. भूषण राऊत यांनीही एक पोस्ट टाकून प्रदेशाध्यक्षपदावर दावा करणा-यांना टोला लगावला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद सांभाळणे कोंबड्या पाळण्याइतके सोपे नाही’, असा खरमरीत टोला भूषण राऊत यांनी पक्षांतर्गत विरोधकांना लगावला. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात धुसफूस असल्याचे चित्र समोर आले आहे.
राष्ट्रवादीच्या दोन प्रवक्त्यांमध्ये सुरू असलेल्या या सोशल मीडिया द्वंद्वानंतर अजित पवार गटाकडूनही प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

अजित पवार गटाचे युवा नेते आशिष मेटे यांनी एक्सवर पोस्ट टाकून शरद पवार गटाला टोला लगावला. ‘भूषण हे जयंत पाटील साहेबांचे एकदम जवळचे व्यक्ती आणि सोबत पक्षाचे प्रवक्ते पण आहेत. पक्षात सारं काही आलबेल नाही हे पक्षाच्या प्रवक्त्याच्या एका ट्वीटने जगासमोर आले आहे. जयंत पाटील-रोहित पवार या संघर्षात आता प्रवक्ते पक्षाची अधिकृत भूमिका मांडून हा वाद आहे हेच अधोरेखित करत आहेत’’ अशी टीका आशिष मेटे यांनी केली.

जाहीररीत्या बोलणे टाळा : जयंत पाटील
पक्षातील अंतर्गत दुफळीबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वर्धापनदिनी भाष्य केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आठ खासदार निवडून येणे, हे टीम वर्क आहे. आपल्याला टीम म्हणूनच राहिले पाहिजे. त्यामुळे चूक होत असेल तर कानात सांगा, जाहीररीत्या सांगू नका, असे म्हणत त्यांनी पक्षातील पदाधिका-यांचे कान टोचले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR