नागपूर : प्रतिनिधी
मनसेप्रमुख राज ठाकरे हे विदर्भ दौ-यावर आहेत. यावेळी बोलताना त्यांनी विविध मुद्यांवर प्रतिक्रिया देताना जोरदार फटकेबाजी केली. त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार हल्ला करत जातीयवादाला कारणीभूत शरद पवार असल्याचे सांगितले.
दरम्यान, पुरोगामी महाराष्ट्राचा उलट प्रवास सुरू झाला आहे, जातीयवादाला कारणीभूत शरद पवार हे आहेत. याची सुरुवात शरद पवारांनी केली. पुलोद स्थापन झाल्यापासून सुरुवात झाली.
पवारांनी अनेक लोक फोडले. जातीचे विष शरद पवारांनी कालवले, शरद पवार सत्तेत यायच्या आधीचा महाराष्ट्र बघा, आज संत जातीमध्ये वाटल्या गेले आहेत. प्रत्येकाला राजकारण करायचे असल्याने जे चालतं ते नाणं चालवून घ्या अशी भाजपची पद्धत आहे. पक्ष फोडणे, आमदार फोडणे सगळ्यांनी बंद केले पाहिजे, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
मला देखील लोक सत्ता देतील
दरम्यान विधानसभा निवडणुकीवर देखील राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी निवडणूक लढवणार, सगळ्या मतदारसंघांत उमेदवार उभे करणार. ५२ वर्षांपासून भाजप सत्ता मागत होती, २०१४ मध्ये त्यांना सत्ता मिळाली, मला देखील लोक सत्ता देतील त्याला वेळ लागेल, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.