29.1 C
Latur
Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रशरद पवारांपाठोपाठ अजितदादा बीड, परभणी दौ-यावर

शरद पवारांपाठोपाठ अजितदादा बीड, परभणी दौ-यावर

मुंबई : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट पसरली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराड यांच्यावर विरोधकांनी गंभीर आरोप केले आहेत. तर परभणी हिंसाचार प्रकरणात पोलिसांच्या कोठडीत असताना सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला. या दोन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज बीड आणि परभणीचा दौरा केला.

या पाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील परभणी आणि बीडचा दौ-यावर आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आज मस्साजोगला जाणार आहेत. दुपारी ३ वाजता विमानाने अजित पवार नागपूरहून लातूरला रवाना होणार आहेत. लातूरवरून हेलिकॉप्टरने मस्साजोगला जाऊन देशमुख कुटुंबियांची सांत्वनापर भेट घेणार आहेत. देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यावर परभणीत दाखल होतील. परभणीत अजित पवार सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेणार आहेत. शरद पवारांच्या पाठोपाठ अजित पवार बीड आणि परभणी दौरा करणार असल्याने हा दौरा महत्त्वाचा मानला जात असून यावेळी अजित पवार नेमकं काय बोलणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

बीडमध्ये काय म्हणाले शरद पवार?
शरद पवार यांनी मस्साजोग गावातील जनतेला धीर देत संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा खोलात जाऊन तपास करण्याची गरज व्यक्त केली. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने आर्थिक मदत केली आहे. पण या मदतीने दु:ख कमी होत नाही. त्यामुळे या हत्याप्रकरणाच्या खोलात जाऊन सूत्रधारांना तातडीने धडा शिकवला पाहिजे, असे शरद पवार यांनी सांगितले. मी इकडे आलो याचे कारण महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात घडलेली गोष्ट ही राज्याला न शोभणारी आहे. देशमुख कुटुंबीयांना न्याय दिला पाहिजे. ते दु:खी आहेत. आपण त्यांच्यासोबत आहोत. पण येथील स्थिती कशी दुरुस्त होईल, याची काळजी आपण घेतली पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.

संतोष देशमुखांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी बारामतीत शोकसभा
दरम्यान, बीड जिल्ह्यात संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर बारामतीमध्ये त्यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. बारामतीतील जिजाऊ भवन या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ही शोकसभा होणार असून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच राजकीय वरदहस्त आरोपींना कोणाचा आहे याचा शोध घेणे गरजेचे आहे. त्यांनादेखील शासन होणे गरजेचे आहे, अशी मागणी क्रांती मोर्चाच्या वतीने मागणी करण्यात आली. तसेच मराठा विखुरलेल्या परिस्थितीत आहे. मराठा समाजाने एकत्र येऊन लढा देण्याची वेळ आली असल्याची भूमिका मांडण्यात आली

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR