21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रशायना एनसींसाठी आक्षेपार्ह शब्द; सावंतांची नरमाईची भूमिका

शायना एनसींसाठी आक्षेपार्ह शब्द; सावंतांची नरमाईची भूमिका

मुंबई : प्रतिनिधी
मुंबादेवी मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवार शायना एनसी यांच्याबाबत ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी वादग्रस्त विधान केले. या वक्तव्याचे राज्याच्या राजकारणात पडसाद उमटत आहेत. या वक्तव्यामुळे अरविंद सावंत यांच्यावर संताप व्यक्त केला जात आहे. हे वक्तव्य प्रकरण अंगावर शेकण्याची चिन्हे दिसल्यानंतर खासदार अरविंद सावंत यांनी नरमाईची भूमिका घेतली असून शायना एनसी या आपल्या मैत्रीण असून त्यांचा अपमान करणार नसल्याचे म्हटले.

दरम्यान, शिवसेना शिंदे गटाच्या मुंबादेवी मतदारसंघातील उमेदवार शायना एनसी यांनी अरविंद सावंत यांच्यावर गंभीर आरोप करत ऑडिओ क्लिप ऐकवली. अरविंद सावंत यांनी मला माल म्हणून संबोधले, असा आरोप शायना एनसी यांनी केला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांवरही शायना एनसी यांनी टीका केली. अरविंद सावंत यांनी केलेल्या वक्तव्यावर शायना एनसी यांनी संताप व्यक्त करताना एका महिलेचा सन्मान करू शकत नाही का, असा सवाल त्यांनी केला.

शायना एनसी यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याने खासदार अरविंद सावंत यांच्यावर संताप व्यक्त केला जात आहे. अशातच त्यांनी आता स्पष्टीकरण दिले आहे. अरविंद सावंत यांनी म्हटले की, माझ्या ५० वर्षांच्या राजकीय-सामाजिक आयुष्यात मी कधीही महिलांचा अपमान केला नाही. तर सन्मान केला. शायना एनसी या माझ्या चांगली मैत्रीण आहेत. मी त्यांचा कधी अपमान करणार नाही असेही त्यांनी म्हटले.

शायना एनसी यांचा संताप…
शायना एनसी यांनी म्हटले होते की, अरविंद सावंत यांची आणि त्यांच्या पक्षाची मन:स्थिती यातून दिसते. त्यांची विचारधारा दिसते. एका महिलेला माल म्हणून संबोधतात. मुंबादेवीतील प्रत्येक महिला ही माल आहे का? ज्यांनी तुमच्यासाठी प्रचार केला त्यांच्यासाठी तुम्ही हे बोलत आहात. मोदींचे नाव लावून जिंकून आलेले मला माल म्हणतायत, अशा शब्दांत शायना एनसी यांनी सुनावले. उद्धव ठाकरे, शरद पवार गप्प का आहेत. संजय राऊत का बोलत नाहीत? एका महिलेचा सन्मान करू शकत नाहीत? तिच्यासाठी माल शब्द वापरता यातून तुमची मन:स्थिती दिसते. महिलेकडे एक माल म्हणून बघत असाल तर महाराष्ट्रातील महिला तुम्हाला कधीच मदत करणार नाही. तुम्ही महिलांना माल म्हणालात तर तुमचे हाल होणार असेही शायना एनसी यांनी म्हटले.

अरविंद सावंत यांनी काय म्हटले होते?
एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना अरविंद सावंत यांनी मुंबादेवी मतदारसंघाबाबत म्हटले की, इथे इम्पोर्टेड माल चालत नाही, आमच्याकडे ओरिजनल माल चालतो. ओरिजनल माल अमिन पटेल आहे, असे अरविंद सावंत म्हणाले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR