मुंबई : प्रतिनिधी
ड्रग्ज प्रकरणावरून विधिमंडळ अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली. यावेळी गावखेड्यापर्यंत पोहोचलेल्या आणि गल्लीतल्या किराणा दुकानातही मिळणा-या एनर्जी ड्रिंकचाही मुद्दा अधिवेशनात चर्चेत आला. आमदार सत्यजीत तांबे यांनी आज सभागृहात लहान मुले आणि विद्यार्थी यांच्या संदर्भातील महत्त्वाचा विषय हाती घेऊन संपूर्ण सभागृहाचे लक्ष वेधले.
राज्य सरकारने ड्रग्जमुक्त महाराष्ट्र मोहीम हाती घेतली असताना किराणा माल आणि शाळा कॉलेजच्या आसपास असलेल्या दुकानात कमी किमतीत उपलब्ध होणारे एनर्जी ड्रिंक हे एखाद्या ड्रग्ज एवढेच घातक असल्याचे आमदार तांबे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर सभापती नीलम गो-हे यांनी चिंता व्यक्त करीत येत्या १५ दिवसांत बैठक घेण्याचे आदेश संबंधित मंत्री आणि प्रशासनाला दिले.
जाहिरातींचे अनुकरण करून तरुण वर्गात दिवसेंदिवस एनर्जी ड्रिंकच्या नावाखाली कॅफेनयुक्त थंड पेय सेवन करण्याचे प्रमाण वाढले आहे. या पेयामुळे आरोग्याला मोठा धोका निर्माण होत आहे. शाळा परिसरात एनर्जी ड्रिंकची सहज विक्री होत असल्याने शाळेतील मुलांना ते सहज उपलब्ध होत आहे. राज्यामध्ये शाळा परिसरातील कॅफेनयुक्त थंड पेयांच्या विक्रीवर बंदी आणा, अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी सभागृहात केली. आमदार सत्यजीत तांबेंनी मांडलेल्या मुद्यावर मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी शाळा परिसरात ५०० मीटर अंतरावर कॅफेनयुक्त पेयांच्या विक्रीवर बंदी घालण्याचे जाहीर केले.
राज्यातील नाशिक मुंबईसह सर्वच शहरी आणि ग्रामीण भागात कॅफेनयुक्त पेय (एनर्जी ड्रिंक्स) तसेच नशेच्या गोळ््या बाजारात विक्रीसाठी सहज उपलब्ध आहेत. तरुण वर्गासोबतच लहान मुलेदेखील याकडे आकर्षित होत आहेत. शाळा व महाविद्यालय परिसरात कॅफेनयुक्त पेय (एनर्जी ड्रिंक्स) सहज उपलब्ध होत असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. त्याचबरोबर जाहिरातीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कॅफेनयुक्त पेयांचा (एनर्जी ड्रिंक्स) प्रसार केला जातो. एनर्जी ड्रिंक्सच्या जाहिरातींवरही सरकारने बंदी घालावी. तसेच शाळा परिसरात कॅफेनयुक्त थंड पेयांच्या विक्रीवर बंदी घालून योग्य कार्यवाही करावी. याबाबत संबधित अधिका-यांसोबत एक बैठक घेण्यात यावी, अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी सभागृहात केली.
स्टिंग आणि आणि इतर काही एनर्जी ड्रिंक्सची किराणा मालाच्या दुकानात मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते. वस्तुत: हे एनर्जी ड्रिंक्स १८ वर्षाखालील मुलांनी सेवन करू नये, असे लिहिण्यात आलेले असते. मात्र, विक्रेते याकडे साफ दुर्लक्ष करून सरसकट वयातील मुलांना याची विक्री करतात. अनेक पालकांमध्येदेखील याबाबत जागरूकता नसल्याचे आढळून आल्याने विक्रीचे प्रमाण अधिक आहे.
१५ दिवसांत बैठक घ्या
आ. सत्यजीत तांबेंनी मांडलेल्या प्रश्नांवर अन्न व औषध प्रशासनाने या संदर्भात १५ दिवसांच्या आत बैठक घ्यावी. त्याचबरोबर एनर्जी ड्रिंक्सच्या जाहिरातींवरदेखील काही आक्षेपार्ह असल्यास अधिका-यांना सांगून कायदेशीर कारवाई करावी, असे सभापती नीलम गो-हे यांनी सांगितले.
शाळा परिसरात एनर्जी
ड्रिंकवर बंदी घालणार
शाळा परिसरात ५०० मीटर अंतरावर कॅफेनयुक्त पेयांवर (एनर्जी ड्रिंक्स) तातडीने बंदी घालण्यात येईल. त्याचबरोबर अन्न व औषध प्रशासनाकडून तपासणी करून योग्य कार्यवाही करण्यात येईल. एनर्जी ड्रिंक्सच्या जाहिरातींवरदेखील कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी सांगितले.