22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeलातूरशिवकालीन शस्त्र प्रदर्शनला उत्स्फूर्त प्रतिसाद 

शिवकालीन शस्त्र प्रदर्शनला उत्स्फूर्त प्रतिसाद 

लातूर : सिद्धेश्वर दाताळ
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्या वतिने आयोजित महासंस्कृती महोत्सव आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेमार्फत आयोजित विभागीय १०० वे नाट्य संमेलनांतर्गत विद्यार्थाना पाहण्यासाठी शिवकालीन शस्त्र प्रदर्शन १३ ते १५ फेब्रुवारी यादरम्यान दयानंद महाविद्यालय मैदानावर सुरु करण्यात आले आहे. या प्रदर्शनास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
या प्रदर्शनात जवळपास १०० हून अधिक शस्त्र मांडण्यात आली आहेत. यात वाघनखे, धनुष्य-बाण, तलवारी, चिलखत, भाले, कट्यार, जांबिया, खंजीर, बिचवे, गुर्ज, तोफांचे गोळे, पट्टा, चिलखत यांसारख्या शस्त्राचे विविध प्रकार एकाच ठिकाणी पाहता येत आहेत. पुरातन काळात जगातल्या प्रमुख पाच शस्त्र परंपरामध्ये भारतीय शस्त्र परंपरा एक होती. भारतीय शस्त्र परंपरेतही राजपूत, मराठा, मोगल यांच्या शस्त्रांची रचना पूर्णता वेगळी असे. या प्रदर्शनात तलवारीचे विविध प्रकार तसेच  त्यांची वैशिट्ये समजवून सागण्यात येत आहे.
यात तीन फुटी वक्राकार समशेर, चार फुटी लांब सरळ तलवार म्हणजे मराठा धोप, राजपूत पद्धतीची वरच्या बाजूला किंचितशी मोठी होत जाणारी दुधारी तलवार म्हणजे खांडा, हत्तीचा पाय तोडण्यासाठी वापरली जाणारी तबर (कुन्हाड), कटारींचे प्रकार, लहान छुपी शस्त्रे विद्यार्थाना पहायला मिळत आहे. या प्रदर्शनात प्रत्येक शस्त्राची माहिती दर्शकांना देण्यात येत आहे. ही शस्त्रे  पाहण्यासाठी नागरिकांसह विद्यार्थांनी पहिल्याच दिवशी गर्दी केली होती. शिवरायांच्या सरदारांनी वापरलेल्या शस्त्रांची लातूरकरांना प्रत्यक्ष पाहणी करण्यात यावी यासाठी शहरातील दयांनद महाविद्यालय येथे शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन भरवले आहे.
या प्रदर्शनाचे स्थान शिवकालीन शस्त्रांची माहिती विद्यार्थांसह नागरिकांना मिळावी यासाठी शिव गर्जना प्रतिष्ठान ठाणे यांच्या माध्यामातून शिवकालीन शस्त्र प्रदर्शन ठेवण्यात आले आहे. यामध्ये मराठा तलवार, भाले, कट्यार, ढाली, शमशेर, मुठी, वाघनखे आणि इतर शस्त्र शिवप्रेमींचे लक्ष वेधून घेतले आहेत. या प्रदर्शनात शिवाजी महाराजांनी युद्धासाठी लढाई प्रकाराची शस्त्रे ही माहिती विद्यार्थाना दिली जात आहे.
या तीन दिवसीय प्रदर्शनामध्ये राष्ट्रीय स्तरावरचे देशी व विदेशी नोटा, नाणी, तिकिटे, दुर्मिळ शिवकालीन वस्तू यांचे प्रदर्शन ठेवण्यात आलेले आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील चलनातील विविध प्रकारच्या तांब्याच्या नाण्यांचे प्रदर्शन मांडण्यात आले. सुमारे दोन ते अडीच हजार वर्षांपूर्वीची नाणी देखील याठिकाणी ठेवण्यात आले आहे. प्राचीन काळापासून म्हणजेच सुमारे अडीच हजार वर्षा आधीपासून तर आत्तापर्यंत विविध साम्राज्यांमध्ये तयार करण्यात आलेली विविध नाणी या ठिकाणी ठेवण्यात आली आहे. यासह भारताच्या बाहेरील देशांमधील हजारो वर्षांपूर्वीची नाणी देखील या प्रदर्शनात आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR