लातूर : प्रतिनिधी
येथील श्री ज्ञानसरस्वती मंदिर संस्थान,मराठवाडा संगीत कला अकादमी आणि रिसर्च सेंटर, सरस्वती संगीत कला महाविद्यालय लातूर यांच्या वतीने संगीत महायज्ञाचे उदगाता तालमणी डॉ. राम बोरगावकर यांच्या संकल्पनेतून प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी दि. ७ ते १० ऑक्टोबर यादरम्यान येथील बार्शी रोडवरील ज्ञानसरस्वती मंदिर सभागृह, संगीत नगरीत झालेल्या ७२ तास अखंड संगीत महायज्ञात महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्राबाहेरील अनेक दिग्गज कलावंतांनी आपली संगीत सेवा रुजू करून लातूरकर रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
या संगीत महायज्ञाप्रसंगी मुंबई येथील सुविख्यात गायिका शुभदा पराडकर यांनी राग पुरिया धनाश्री बडाख्याल दरसमध्ये ‘आना वे मिल जाना वे’ ही बंदिश अतिशय उत्स्फूर्तपणे सादर करुन लातूरकर रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांना तबलासंगत तालमणी डॉ. राम बोरगावकर यांनी केली. याप्रसंगी शिर्डी येथील सुप्रसिद्ध गायक संकेत दरकदार, गायिका सरस्वती बोरगावकर-शिलवंत, युगंधरा केचे यांनी आपली गायनसेवा उत्स्फूर्तपणे सादर करुन रसिकांची उत्स्फूर्त दाद घेतली. त्यांना तबलासंगत प्रा. गणेश बोरगावकर आणि प्रा. राजेंद्र
भोसले यांनी केली. तर हार्मोनियम साथ सूरमणी पं. बाबुराव बोरगावकर, प्रा. लक्ष्मण श्रीमंगले यांनी केली.
या अखंड संगीत यज्ञाप्रसंगी मुंबई येथील युवा सितारवादक गरिमा आणि रिद्धीमा शेजाळ यांनी राग रागेश्री मध्यलय व दृत तीनतालमध्ये सितारवादन करून रसिकांची उत्स्फूर्त दाद घेतली.याप्रसंगी मधुवंती बोरगावकर देशमुख यांनी राग हंस ध्वनी चीज गायली. या पंढरीचे सुख ,बोलवा विठ्ठल हे भजन गावून ‘सहेला रे’ ही किशोरीताई याची बंदिश अतिशय तयारीने सादर करून रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. या समारोहाप्रसंगी पं. भीमराव वाघचौरे आणि त्यांच्या २१ विद्यार्थ्यांनी सामूहिक पखवाज वादन करून रसिकांना अक्षरश: मंत्रमुग्ध केले. या संगीत यज्ञाचा समारोप सुरमणी पं. बाबुराव बोरगावकर यांच्या भैरवी गायनाने झाला. या तीन दिवस चाललेल्या संगीत समारोहाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रा.डॉ.सुदाम पवार आणि प्रा. विश्वनाथ स्वामी यांनी केले. तर या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. लक्ष्मण श्रीमंगले, प्रा. विश्वनाथ स्वामी, प्रा. विजयकुमार धायगुडे, प्रा. नामदेव साठे, प्रा. अमोल जाधव, प्रा. बालाजी श्.िांदे, प्रा. वसंत बंडे, मीनाक्षी भारती, सुनीता शिंदे यांनी परिश्रम घेतले.