पूर्णा : परभणी शहरा जवळील शेंद्रा परीसरातील इंडीयन ऑईल पेट्रोल पंप परीसरात चालत्या दुचाकीने पेट घेतल्याची घटना रविवार, दि.६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत मोटार सायकलवरील दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच आजुबाजूच्या नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली व दोन्ही जखमींना परभणी येथे उपचारार्थ पाठवले.
या घटनेत जळून खाक झालेली दुचाकी पिंगळी येथून परभणीकडे जात होती. याच वेळी पाठीमागून आलेली दुचाकी जोरात ओव्हटेक करून पुढे निघून गेली. यावेळी पिंगळीवरून परभणीकडे जाणा-या दुचाकीस्वाराने ब्रेक मारल्याने गाडी रस्त्यावर पडताच गाडीने पेट घेतला. या घटनेत अवघ्या १५ मिनीटात संपूर्ण गाडी जळून खाक झाली आहे. यावेळी घटनास्थळी नागरीकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. या घटनेची दिवसभर चर्चा होताना दिसून येत होती.