नवी दिल्ली : वृत्तसंस्था
दिल्ली सीमेवरील शेतकरी आंदोलनाची धग वाढत चालली असून खानौरी सीमेवरील चकमकीत एका शेतक-याचा मृत्यू झाल्यानंतर शेतकरी संघटना आक्रमक झाल्या. या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवार, दि. २३ फेब्रुवारी रोजी देशभर काळा दिवस पाळण्यात येणार असून १४ मार्चला रामलीला मैदानावर आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा किसान मोर्चाकडून आज करण्यात आली.
शेतक-यांच्या मृत्यूनंतर शेतकरी संघटनांनी ‘दिल्ली चलो’ आंदोलनास तूर्त ब्रेक लावला आहे. ‘शेतक-यांच्या मृत्यू प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा,’ अशी मागणी शेतकरी नेते सरवनसिंग पंधेर यांनी केली. शेतक-यांचे २५ ते ३० ट्रॅक्टर आणि ट्रॉली यांचे नुकसान केल्याप्रकरणी निमलष्करी दलाच्या कर्मचा-यांंविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पंधेर यांनी केली. दरम्यान पंजाब- हरियानाच्या खानौरी सीमेवर शेतकरी आंदोलक आणि पोलिस यांच्यात झालेल्या चकमकीत एका शेतक-याचा मृत्यू झाला होता तर बारा पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. शुभकरन सिंग (वय २१) असे मरण पावलेल्या युवा शेतक-याचे नाव असून तो भटिंडा जिल्ह्यातील रहिवासी आहे.