जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यामध्ये यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. यामुळे तालुक्यातील सर्वच साठवण तलाव तसेच पाझर तलाव तुडुंब भरले आहे यासोबतच तिरू नदीवर उभारण्यात आलेल्या उच्च पातळी बंधा-यातही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे यामुळे यावर्षी जळकोट तालुक्यात उसाची लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे तालुक्यात यावर्षी उसाच्या क्षेत्रात वाढ होणार आहे .
जळकोट तालुक्यात जवळपास पंधरा साठवण तलाव आहेत. जळकोट तालुक्यामध्ये सन २०२२ व २०२३ यावर्षी अतिशय कमी पाऊस पडला होता यामुळे साठवण तलावातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत गेला. यावर्षीच्या उन्हाळ्यात तर सर्व साठवण तलाव कोरडे ठाक पडले होते अनेक शेतक-यांनी पाऊस पडेल या आशेवर मोठ्या प्रमाणामध्ये २०२३ मध्ये उसाची लागवड केली होती परंतु पाऊस पडला नाही आणि जलस्त्रोत म्हणावे तेवढे भरले नाहीत. यावर्षीच्या उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाईची तीव्रता जाणवू नये यासाठी प्रशासनाने साठवण तलावावरील मोटारीचे कनेक्शन तोडले. यामुळे ज्या शेतक-यांंनी उसाची लागवड केली होती अशा शेतक-याच्या ऊसाला पाणी न मिळाल्यामुळे ऊस जाग्यावर वाळून गेला.
अनेक शेतक-यांनी नवीन उसाची लागवड केली नाही व ज्या शेतक-यांंचा खोडवा ऊस होता तसेच ज्या शेतक-यांंनी पहिल्यांदाच उसाची लागवड केली होती अशा शेतक-यांनी पाण्याअभावी आपला ऊस मोडला. या ठिकाणी सोयाबीन तसेच कापूस या पिकाची लागवड केली. तालुक्यात दरवर्षी जवळपास दोन ते तीन हजार एकर क्षेत्रावर उसाची लागवड केली जाते परंतु गतवर्षी मात्र फक्त तीनशे एकर क्षेत्रावरच उसाची लागवड होती तीही कमी केली होती मात्र आता यावर्षी जळकोट तालुक्यात पाऊस झाल्यामुळे सर्वच साठवण तलाव तुडुंब भरले आहेत . यामुळे ऊस लागवडीसाठी मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाल्यामुळे यावर्षी अनेक शेतकरी ऊसाची लागवड करीत आहेत . यावर्षी तालुक्यात जवळपास पाच हजार हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता यावर्षी नव्याने मोठ्या प्रमाणात तालुक्यात उसाची लागवड होणार आहे. जळकोट तालुक्यातील हळदवाढवणा, रावणकोळा, माळहिप्परगा, डोंगर कोणाळी, सोनवळा, हावरगा, चेरा १, चेरा २, गुत्ती १, गुत्ती २ , डोंगरगाव, खंबाळवाडी, केकतशिंदगी, जंगमवाडी या ठिकाणचे साठवण तलाव शंभर टक्के भरले आहेत.