28.9 C
Latur
Sunday, February 25, 2024
Homeलातूरसंघर्षाला सकारात्मक प्रतिसाद; उत्स्फूर्त स्वागत

संघर्षाला सकारात्मक प्रतिसाद; उत्स्फूर्त स्वागत

लातूर : प्रतिनिधी
मराठा आरक्षणयोध्दा मनोज जरांगे यांच्या संघर्षाला मिळालेल्या यशाचे व सरकारने मराठा समाजाच्या मागण्यास दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाचे स्वागत शनिवार, दि. २७ जानेवारी रोजी येथील मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाने उत्स्फूर्त  उत्साह व  जल्लोषात केले. छत्रपती शिवरायांचा जयजयकार व एक मराठा, लाख मराठा या घोषणांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक निनादून गेला होता. शुक्रवारी सकाळपासूनच सकल मराठा समाजाच्या नजरा व कान काय घडेल याकडे लागल्या होत्या. याच उत्सुकतेत त्यांनी रात्र अक्षरश: जागून काढली.
पहाटे शासनाचे प्रतिनिधी सकारात्मक मसुदा घेऊन जरांगे पाटलांकडे आले व तो स्वीकारत असल्याची घोषणा पाटलांनी करताच सकल मराठा समाजाच्या आनंदास पारावार उरला नाही. त्याच वेळी शहर व जिल्ह्यात फटाके फुटले व शनिवारची सकाळ छत्रपती शिवरायांना अभिवादनाने एकमेकांना पेढे-जिलेबी भरवून झाली. लातूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाज भगव्या टोप्या घालून, भगवे झेंडे हाती घेऊन आला होता.  प्रारंभी शिवरायांना अभिवादन करण्यात आले. त्या नंतर मनसोक्त गुलाल व फुलांची उधळण करण्यात आली. त्या नंतर हलग्या कडाडल्या  व ढोल ताशांच्या गजरात सर्वांनी ठेका धरला. गुलालाची उधळण अन् फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. महिलांनी फुगड्या खेळल्या. पेढे व जिलेबी वाटण्यात आली. एक मराठा लाख मराठा, जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा देण्यात आल्या.
सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांस दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाचे आम्ही स्वागत करतो. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मिळालेले हे यश मराठा समाजाने आरक्षणासाठी आजवर केलेल्या संघर्षाचे फलित आहे.  एक प्रामाणिक, पारदर्शी अन् नि:स्वार्थी  नेतृत्व समाजासाठी किती महत्त्वाचे असते अन् समाजही अशा नेतृत्वास कसा जीवापाड जिव्हाळा लावतो, हेच या जल्लोषाने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.  मनोज जरांगे-पाटील यांच्या समर्पणाचा तसेच या विधायक कामासाठी आपले  आयुष्य वेचलेल्या सर्वांचा समाज सदैव ऋणी राहील, अशी भावना मराठा क्रांती मोर्चाने या वेळी व्यक्त  केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR