20 C
Latur
Saturday, November 16, 2024
Homeक्रीडासंजू-तिलकची शतके, द. आफ्रिकेविरुद्ध भारताचा मालिका विजय

संजू-तिलकची शतके, द. आफ्रिकेविरुद्ध भारताचा मालिका विजय

जोहान्सबर्ग : वृत्तसंस्था
जोहान्सबर्गच्या मैदानात संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांनी चौकार-षटकारांची अक्षरश: बरसात केली आणि २८३ धावा करीत भारतासाठी टी-२० मधील दुसरी सर्वोच्च धावसंख्या उभारली. या सामन्यात संजू आणि तिलकने विक्रमी भागीदारी रचली. यात तब्बल २३ षटकार ठोकले. धावांच्या डोंगराचा पाठलाग करताना द. आफ्रिकेला १५० चा आकडाही पार करता आला नाही. १८.२ षटकांत १४८ धावा काढून संपूर्ण संघ तंबूत परतला. त्यामुळे भारताचा १३५ धावांनी विजय झाला. ४ सामन्यांची ही मालिका भारताने ३-१ ने जिंकली.

संजू सॅमसन, तिलक वर्मा यांच्यात शतक आधी कोण करणार, अशी स्पर्धा सुरू होती. अखेर सॅमसनने दोन भोपळ््यानंतर ५१ चेंडूत शतक साजरे केले. एका वर्षात ३ टी-२० शतक झळकावणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला. त्याच्यापाठोपाठ तिलक वर्माने ४१ चेंडूत सलग दुसरे शतक ठोकले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका डावात दोन शतक झळकावण्याचा खास विक्रम या भारतीय जोडीने केला. संजूने ५६ चेंडूत ९ षटकार, ६ चौकारांच्या मदतीने १०९ धावा तर ४७ चेंडूत १० षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने १२० धावा केल्या. या दोघांनी ८६ चेंडूत २१० धावांची विक्रमी भागीदारी केली. तत्पूर्वी अभिषेक शर्माने १८ चेंडूत ४ षटकार, २ चौकारांसह ३६ धावा केल्या होत्या. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये शतकी खेळी करून दाखविणारी टॉप १० टीममधील ही पहिली जोडी ठरली आहे. या अगोदर भारताने हैदराबाद येथे २०२४ मध्ये भारत-बांगला देशमध्ये झालेल्या सामन्यात भारताने २९७ धावा करीत सर्वोच्च धावसंख्या उभारली होती. २०१९ मध्ये डेहराडून येथे अफगाणिस्तान-आयर्लंडने २७८ धावा केल्या होत्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR