नागपूर : प्रतिनिधी
राहुल गांधी नेहमी संविधान दाखवतात. संविधानाचा सन्मान सर्वांनीच केला पाहिजे, मग लाल संविधान कशासाठी? असा सवाल भाजपा नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.
त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. पण फडणवीसांनी केलेल्या आरोपांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राहुल गांधी हे भाजपाची मोठी अडचण आहेत आणि त्यामुळे त्यांना ते घाबरतात. पण जे लोक संविधानाला विरोध करतात, त्यांनी त्याचा रंग ठरवू नये, असा टोलाच पटोलेंनी लगावला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी (ता. ६ नोव्हेंबर) प्रसार माध्यमांशी नागपूर येथे संवाद साधला. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानावर उत्तर देत म्हटले की, त्यांनी काय बोलावे हा त्यांचा प्रश्न. नागपुरातील त्यांच्या शक्ती केंद्रावर काय उपक्रम चालतात, हे सर्वांना माहीत आहेत. त्यामुळे ज्या लोकांनी आरक्षणाचा विरोध केला. संविधानाचा विरोध केला, संविधानाला जाळलं त्या व्यवस्थेच्या बाजूला आमच्या काँग्रेसचा कार्यक्रम होत आहे. त्यामुळे संविधानाची जेव्हा जेव्हा चर्चा केली जाते, तेव्हा तेव्हा त्याला भाजपाकडून विरोध करण्यात येतो हे चित्र आपण पाहतो. त्यामुळे राहुल गांधी यांच्या संविधान बचाव या मोहिमेमध्ये त्यांना नक्षलवादच दिसेल. कारण त्यांची ती मानसिकता आहे. त्यामुळे याबाबत आम्ही फार काही बोलावे असे आम्हाला वाटत नसल्याचे पटोलेंकडून सांगण्यात आले.
तर, लाल रंग हा हिंदू संस्कृतीत शुभ मानला जातो. लग्नामध्ये, पूजेमध्ये लाल रंगालाच शुभ मानले जाते. जर संविधानाच्या पुस्तकाचा रंग लाल असेल, काळा असेल, निळा असेल किंवा पिवळा असला तरी जे संविधानाला विरोध करतात, त्या लोकांना त्या रंगाशी काय घेणे-देणे. त्यामुळे त्यांनी संविधान पुस्तिकेचा रंग कोणता असावा, हे त्यांनी ठरवू नये, असा टोला पटोलेंनी लगावला. तसेच, ज्या लोकांचे संविधानात कोणतेही योगदान नाही, ज्यांनी संविधानाला जाळून मनुस्मृतीला आणण्याचे काम केले आहे, त्या लोकांसाठी संविधान वाचवणारे हे नक्षलवादीच असणार आहेत. त्यामुळे शहरी नक्षलवाद बोलण्याचे काम करत आहेत. पण राहुल गांधी हे देशाला जोडण्याचे आणि संविधान वाचविण्याचे काम करत आहेत, हे देशातील लोकांना माहीत आहे. त्यामुळे भाजपाला त्याचा त्रास होत असल्याचा पलटवार नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे.